
जळगावमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, या घटनेनं खळबळ उडाली आहे. जळगावमध्ये सुरू असलेल्या एका बनावट कॉल सेंटरचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी आठ जणांना ताब्यात घेतलं आहे, त्यामध्ये माजी महापौरांचा देखील समावेश आहे.
या कॉल सेंटरच्या माध्यमातून विदेशी लोकांशी संपर्क साधून त्यांना ऑनलाईन गंडा घालण्यात येत होता. आतापर्यंत या कॉल सेंटरच्या माध्यमातून अनेक लोकांची फसवणूक करण्यात आली आहे, अशी माहिती समोर येत आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी या कॉल सेंटवर छापा टाकाला.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, कॉल सेंटरच्या माध्यमातून विदेशी लोकांना संपर्क साधून, वेगवेगळ्या पद्धतीने त्यांची ऑनलाइन फसवणूक सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. जळगावातील मुराबाद रोडवर असलेल्या माजी महापौरच्या फॉर्म हाऊसमध्ये हे बनावट कॉल सेंटर सुरू होतं. या बनावट कॉल सेंटरवर पोलिसांनी छापा टाकला आहे. या प्रकरणात पोलिसांनी माजी महापौर ललित कोल्हे यांच्यासह एकूण 8 जणांना ताब्यात घेतले असून, अटकेची कारवाई सुरू आहे.
शिवसेना शिंदे गटात असलेले माजी महापौर ललित कोल्हे यांच्या मालकीचा हा फॉर्म हाऊस आहे. तिथेच हे कॉल सेंटर सुरू होतं. तेच हे कॉल सेंटर चालवत असल्याचा पोलिसांना संशय आहे. या बनावट कॉल सेंटरच्या माध्यमातून विदेशी नागरिकांना आतापर्यंत लाखो रुपयांचा गंडा घालण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पश्चिम बंगाल आणि इतर राज्यातील तरुण या ठिकाणी काम करत होते. या तरुणाच्या माध्यमातून वेगवेगळ्या ऑनलाईन कंपन्यांचे नाव सांगून लोकांची फसवणूक सुरू असल्याचं समोर आलं आहे. 20 दिवसांपूर्वीच सुरू झालेल्या या बनावट कॉल सेंटरच्या माध्यमातून अनेक विदेशी नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे, घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याचंही पोलिसांनी सांगितलं. दरम्यान या प्रकरणात जळगाव शहरातील तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आता समोर आली आहे.