ताज्या बातम्यामहाराष्ट्र
बापासमोरच दोन वर्षाच्या मुलाला जबड्यात धरून बिबट्या पसार; १५० जवानांकडून शोधमोहिम …

नाशकातून काळजाचा ठोका चुकवणारी घटना समोर आली आहे. बिबट्याच्या हल्ल्यात एका दोन वर्षाच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. नाशिक रोडच्या वडनेर दुमाला गावाच्या मुख्य चौकात आर्टिलरी सेंटरच्या कारगिल प्रवेशद्वारालगत लष्करी जवानांचे एम.एम. क्वार्टर वसाहत आहे.
या वसाहतीत बिबट्याने मंगळवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास प्रवेश करत अंगणातून लष्करी जवानाच्या दोन वर्षीच्या चिमुकल्याला उचलून नेले होते.मध्यरात्री उशिरापर्यंत वनविभागाच्या पथकांसह आर्टिलरी सेंटरमधील जवानांकडून जंगलात व वालदेवीच्या पात्रालगत मुलाचा शोध घेतला जात होता. बुधवारी अखेर या चिमुकल्याचा मृतदेह सापडल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.
पाथर्डी वडनेर रस्त्यावरील पिंपळगावाच्या पुढे छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे. या चौकाजवळच आर्टिलरीचे प्रवेशद्वार आहे. परिसरात झाडीझुडपांचे जंगल आहे. या जंगलातून बिबट्या वसाहतीत आला. बिबट्याने ओट्यावर खेळणाऱ्या श्रुतीक गंगाधर या चिमुकल्याला जबड्यात धरून धूम ठोकली. रडण्याचा आवाज येताच पित्याने बाहेर धाव घेतली असता बिबट्या वेगाने पळत नदीकडे जात असल्याचे त्यांच्या नजरेस पडला. यावेळी आजूबाजूला असलेल्या जवानांनी आरडाओरड करत धाव घेतली. सुमारे शंभर मीटरपर्यंत पित्यासह त्यांचे सहकारी धावत सुटले. मात्र बिबट्या पसार झाला होता. नाशिक वनपरिक्षेत्र कार्यालयाचे पथकाने धाव घेतली. मंगळवारी मध्यरात्री सव्वाबारा वाजेपर्यंत बेपत्ता मुलाचा शोध लागू शकला नव्हता.
काळजाच्या तुकड्याला बिबट्या जबड्यात धरून घेऊ गेल्याचे समजताच माता-पित्याला जबर धक्का बसला. श्रुतीकची आई जमिनीवर कोसळली. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. वनकर्मचाऱ्यांसह आर्टिलरी सेंटरच्या सुमारे दीडशेपेक्षा जास्त जवानांकडून मुलाच्या शोधमोहिमेत सहभाग घेण्यात आला होता. परिसर पिंजून काढत मुलाला शोधले जात होते. अखेर वनविभाग आणि जवानांच्या शोधमोहिमेनंतर श्रुतीकचा मृतदेह सापडला.