बीड जिल्ह्याच्या विकासाला चालना देणारा सोहळा आज बीड रेल्वे स्थानकावर थाटात संपन्न …

बीड : मराठवाड्यातील बीडकरांसाठी ऐतिहासिक क्षण ठरलेला आणि जिल्ह्याच्या विकासाला चालना देणारा सोहळा आज बीड रेल्वे स्थानकावर थाटात संपन्न झाला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार, मंत्री पंकजा मुंडे, खासदार बजरंग सोनवणे यांच्यासह बीड जिल्ह्यातील सर्वच आमदार आणि कानाकोपऱ्यातून आलेल्या जनसमुदायाच्या उपस्थितीत हा सोहळा राजकीय उत्साह आणि श्रेयवादाच्या फटाक्यांनी गाजला.
व्यासपीठावरील भाषणांमध्ये नेत्यांनी बीड रेल्वेसाठी केलेल्या संघर्षाच्या आठवणींना उजाळा दिला. यानंतर, बीड-अहिल्यानगर रेल्वे मार्गावर पहिल्यांदा रेल्वे धावली. हिरवा झेंडा दाखवताच प्रवाशांनी फोटो, व्हिडिओ काढत आनंद साजरा केला.
बीड ते अहिल्यानगर ४० रुपयांत –
बीड-अहिल्यानगर-परळी या २६१ किमी रेल्वे मार्गापैकी पहिल्या टप्प्यात १६७ किमीच्या बीड-अहिल्यानगर मार्गावर आजपासून रेल्वे प्रवास सुरू झाला आहे. या मार्गावर एकूण १५ स्थानके असून, कमीतकमी तिकीट १० रुपये आणि जास्तीतजास्त ४० रुपये आहे. पहिले स्थानक राजुरी नवगण असून, बीडवरून फक्त १० रुपयांत तिथे पोहोचता येईल. उर्वरित बीड-परळी मार्गाचे काम अद्याप प्रगतिपथावर आहे.
रेल्वे स्थानक शहरापासून ६ किमी दूर –
बीडचे नवे रेल्वे स्थानक पालवण गावात, बीड बस स्टँडपासून ६ किमी अंतरावर आहे. बीड ते अहिल्यानगर डेमू रेल्वेचे तिकीट ४० रुपये आहे. मात्र, रेल्वे स्थानकापर्यंत पोहोचण्यासाठी रिक्षाचालक १५० ते २०० रुपये भाडे आकारू शकतात, असे सांगितले जाते.
रेल्वेची वेळ आणि प्रवास –
बीड-अहिल्यानगर रस्त्याने अडीच ते पावणेतीन तासांत कापले जाणारे अंतर रेल्वेने ५.५ तासांत पूर्ण होईल, कारण डेमू रेल्वेचा सरासरी वेग ३० किमी प्रतितास आहे. ही रेल्वे आठवड्यातून सहा दिवस धावणार आहे. गाडी क्रमांक ७१४४१ सकाळी ६:५५ वाजता अहिल्यानगरवरून निघून दुपारी १२:३० वाजता बीडला पोहोचेल. तर, गाडी क्रमांक ७१४४२ दुपारी १:०० वाजता बीडवरून निघून सायंकाळी ६:३० वाजता अहिल्यानगरला पोहोचेल.
रेल्वे मार्गावरील स्थानके –
बीड ते अहिल्यानगर या १६७ किमी मार्गावर १५ स्थानकांचा समावेश आहे त्यामध्ये बीड, राजुरी (नवगण), रायमोहा, विघनवाडी, जाटनांदूर, अळमनेर, हतोला, वेताळवाडी, न्यू आष्टी, कडा, न्यू धानोरा, सोलापूरवाडी, न्यू लोणी, नारायणडोह, अहिल्यानगर…