बीडसह महाराष्ट्राला पाऊस झोडपून काढणार! पुढील आठवडाभर अनेक जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा …

पावसाने राज्यभरात पुन्हा हजेरी लावली आहे. आज (शुक्रवार, ता. १२) सकाळपासूनही पावसाच्या सरी कोसळत आहेत. मुंबईतही पावसाची रिमझिम सुरु असल्याचे दिसून येत आहे.
अशातच हवामान विभागाने पुढील आठवडाभर १७ जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र राज्यातील १७ जिल्ह्यात १३ ते १८ सप्टेंबर या कालावधीत अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग यांसह रायगड, कोल्हापूर, सांगली, सातारा, अहमदनगर, लातूर, नांदेड, बीड, परभणी, हिंगोली आणि यवतमाळ या जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याच्या अंदाज वर्तवण्यात आली आहे.
दरम्यान, आठवडाभर मुसळधार पाऊस पडणार असून हवामान विभागाने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच नदीकाठच्या भागात राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसेच या पावसामुळे पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने आवश्यक काळजी घेण्याचे सांगण्यात आले आहे.
२० राज्यांना पावसाचा अलर्ट
गेल्या काही दिवसांपासून वातावरण ढगाळ राहत असून नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळत आहे. या दरम्यान, आता २० राज्यांना हवामान विभागाने अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. महाराष्ट्रासह अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, छत्तीसगड, बिहार, उत्तराखंड, गुजरात, तामिळनाडू अशा अनेक भागात मुसळधार पावसाच्या सरी कोसळणार असल्याचे म्हटले आहे.