
ठाणे जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. पोलिसांनी 41 वर्षीय अभिनेत्रीच्या वैश्या व्यवसायाचा पर्दाफाश केला आहे. ही अभिनेत्री हिरोईन बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून ऑडिशन देणाऱ्या तरुणींना वेश्यावृत्तीत ढकलत होती.
तिने या तरुणींचा एक गट बनवला होता आणि या महिलांना बेकायदेशीरपणे धंद्यात ढकलत असल्याचा तिच्यावर आरोप करण्यात आला आहे. मुंबईत या अभिनेत्रीला रंगेहात पकडण्यात आले आहे. नेमकं कसं पकडलं चला जाणून घेऊया…
ही अभिनेत्री गेल्या कित्येक वर्षांपासून वेश्या व्यवसाय करत होती. पोलिसांनी तिला मुबंईत रंगेहात पकडल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे. आरोपी महिलेला अगदी फिल्मी स्टाईलने अटक करण्यात आली आहे. काही पोलिस अधिकारी हे ग्राहक बनून या महिलेच्या ग्रूपपर्यंत पोहोचले आहेत. कारवाईनंतर त्यांनी एका बंगाली अभिनेत्रीला आणि छोट्या पडद्यावरील अभिनेत्रीची सुटका केली आहे.
ग्राहक बनून पोहोचले पोलीस अधिकारी
या प्रकरणाबाबत एका अधिकाऱ्याने सांगितले की, एका गुप्त माहितीवरून कारवाई करण्यात आली. पोलिसांच्या एका पथकाने दोन लोकांना बनावट ग्राहक बनवून पाठवले होते. त्यांनी अनुष्का मोनी मोहन दास नावाच्या आरोपीशी संपर्क साधला. तिने कथितपणे या ग्राहकांना बुधवारी मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील काशीमीरा येथील एका मॉलमध्ये भेटण्यासाठी बोलावले.
बंगाली अभिनेत्रीची सुटका
मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलिसांचे सहाय्यक पोलिस आयुक्त मदन बल्लाल यांनी सांगितले, “पथकाने परिसरावर छापा टाकला आणि आरोपींना बनावट ग्राहक बनवून पाठवलेल्या लोकांकडून पैसे घेताना रंगेहाथ पकडले. आम्ही टीव्ही मालिकांमध्ये आणि बंगाली चित्रपटांमध्ये सक्रिय असलेल्या दोन महिलांना देखील या प्रकरणातून बाहेर काढले आहे.” त्यांनी सांगितले की, दास यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 143(3) (मानवी तस्करीशी संबंधित) आणि अनैतिक व्यापार (निवारण) अधिनियम (PITA) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, वाचवण्यात आलेल्या महिलांना आश्रय गृहात पाठवण्यात आले आहे.