तरुणाईमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. ग्रामीण भागातील तरुणीईसुद्धा दारुच्या आहारी गेलेली दिसून येते. या दारुच्या व्यसनातून मोठेमोठे वादही होतात.
इतकेच नव्हे तर दारुच्या कारणावरुन हत्येच्या घटनाही घडत असल्याचे तुम्ही ऐकले असेल. मात्र, या सर्वांमध्ये एक गाव सर्वांना प्रेरणा देत आहे. या गावात दारूबंदीचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
मध्यप्रदेश राज्यातील बुऱ्हाणपूर जिल्ह्यातील हे गाव आहे. जम्बू पानी असे या गावाचे नाव आहे. याठिकाणी दारुबंदी करण्यात आली असून 21 हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. गावकऱ्यांनी आधी एक महिन्यासाठी हा पुढाकार घेतला. या दरम्यान गावातील एकही व्यक्ती दारू प्यायलेला दिसला नाही. दारु विकणाऱ्याबाबत सूचना दिल्यावर 2 हजार रुपयांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले.
गावातील लालसिंह यांनी सांगितले की, या गावात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच्या सर्व दारूच्या व्यसनात बुडाले होते. यामुळे गावात वाद-विवादाच्या घटना वाढताना दिसत होत्या. मुले शाळत जात नव्हती. लहान लहान मुलेही दारू पित होती. यामुळे गावात एक बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत गावात आता एकही व्यक्ती दारू विकणार नाही आणि कुणीच दारू पिणार नाही, असा निर्णय घेण्यात आला.
जर कुणी दारू विकताना दिसला तर त्याच्यावर 21 हजार रुपयांचा दंड आकारण्यात येईल. तसेच पोलिसांच्या वतीनेही कार्यवाही करण्यात येईल. तसेच दारू विकणाऱ्याची माहिती देणाऱ्यास 2 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
हा प्रस्ताव पास होऊन आता 1महिना झाला असून याठिकाणी आता कुणीही दारू पिताना दिसत नाही. या गावाने घेतलेल्या या निर्णयाची सर्वत्र चर्चा होत आहे. तसेच गावकऱ्यांनी घेतलेल्या निर्णयाचे कौतुकही केले जात आहे. शाहपुर पोलीस ठाण्याचे प्रभारी यांनी सांगितले की, गावकऱ्यांचा हा निर्णय प्रेरणादायी आहे.