भारतातील गावांची अवस्था नक्कीच आता वीस वर्षांपूर्वीसारखी नसली तरी संपत्तीच्या बाबतीत ते इतर देशांना मागे टाकतील, असा विचार केला तर तुम्हाला थोडं अतिरंजित वाटत असेल ना?
मात्र, हे खरं आहे. आशियातील सर्वात श्रीमंत गाव जपान किंवा चीनमध्ये नाही तर भारतात आहे. हे गाव गुजरातमध्ये असून याचं नाव माधापूर असं आहे. या गावात एकूण ३२ हजार लोक राहतात. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की या गावातील लोकांनी ७ हजार कोटी रुपयांच्या एफडीही केल्यात.
हे गाव भुजच्या सीमेवर आहे. येथे तुम्हाला देशातील प्रत्येक मोठ्या बँकेची शाखा मिळेल. गावाच्या श्रीमंतीचं रहस्य परदेशात राहणाऱ्या येथील रहिवाशांमध्ये दडलेलं आहे. ते जिथे राहतात तिथे पैसे जमा करण्याऐवजी ते आपल्या गावी परत पाठवतात. या गावात बहुतांश लोक पटेल समाजातील आहेत. त्यांनीच या गावाच्या प्रगतीमध्ये मोठी भूमिका बजावली आहे.
७ हजार कोटींची एफडी
या लोकांनी माधापूर गावाचं पूर्ण चित्रच बदलून टाकलं आहे. चांगले रस्ते, चांगला पाणीपुरवठा, स्वच्छतेची चांगली व्यवस्था, शाळा, आरोग्य सेवा या सर्व गोष्टी या गावात उपलब्ध आहेत. गावकऱ्यांकडे एवढा पैसा आहे की येथे एक-दोन नव्हे तर १७ बँकांच्या शाखा आहेत. एचडीएफसी बँक, युनियन बँक, आयसीआयसीआय बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक आणि अॅक्सिस बँक या सर्व बँका या गावात आहेत. या बँकांमध्ये गावकऱ्यांच्या सात हजार कोटी रुपयांच्या ठेवी आहेत.
कुठून येतो पैसा?
फक्त पैसे आहेत याचा अर्थ गावकरी काम करत नाहीत असा होत नाही. शेतीपासून ते दुकानापर्यंत सर्व कामे तs करतात. अशा वेळी एवढी मोठी रक्कम त्यांच्याकडे कुठून आली, असा प्रश्न तुमच्या मनात आला असेल. गावातील सुमारे १२०० लोकांची कुटुंबं परदेशात राहतात. परदेशात स्थायिक होऊनही त्यांनी गावाशी असलेलं नातं तोडलेलं नाही. परदेशात राहणारे लोक आपल्या नातेवाईकांना, कुटुंबियांना पैसे पाठवतात. इतकंच नाही तर ते आपल्या कमाईचा काही भाग माधापुरच्या स्थानिक बँका आणि टपाल कार्यालयात जमा करतात. अनिवासी भारतीयांच्या या पैशांमुळे बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात पैसे जमा होत आहेत.
अनिवासी भारतीयांकडून येणारा पैसा हा येथील उत्पन्नाचा सर्वात मोठा स्त्रोत आहे. त्यांच्या पैशांमुळे येथील बँका आणि टपाल कार्यालयांमध्ये सात हजार कोटींहून अधिक रक्कम जमा झाली आहे. याशिवाय गावातील लोक शेती करतात आणि शेतमाल विकून कमाई करतात. परदेशात राहत असलेल्या लोकांना देश-गावाशी जोडून ठेवण्यासाठी माधापुर व्हिलेज असोसिएशनची स्थापना करण्यात आली. यामाध्यमातून परदेशात राहणाऱ्या गावातील लोकांशी संपर्क राखण्यासाठी मदत घेतली जाते.