Eknath Shinde : राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले आहे. त्यानंतरही महायुतीकडून सत्ता स्थापनेबाबत कोणतीही हालचाल दिसून येत नाही. महायुतीचा नवा मुख्यमंत्री कोण, यावर तिढा सुरू झाला आहे.
भाजप आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून देवेंद्र फडणवीस यांचे नाव पुढे करण्यात आले आहे. तर, शिवसेना शिंदे गटाने एकनाथ शिंदे यांच्या हातीच पुन्हा कारभार देण्याची मागणी केली आहे. आता ही कोंडी फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भाजपने दिलेल्या ऑफरवर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत.
भाजपने कोणती ऑफर दिली?
भाजपने शिंदे यांना २ ऑफर दिल्या आहेत. यात थेट मोदींच्या टीममध्ये सामील होण्याची ऑफर आहे.भाजपकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्याची भाजपची तयारी आहे, अशी पहिली ऑफर आहे. जर शिंदे यांनी ही ऑफर स्वीकारली तर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टीममध्ये सामील होण्याची संधी आहे. तर एकनाथ शिंदे यांना भाजपकडून राज्यात उपमुख्यमंत्रीपदाची ॲाफर दिली आहे. मुख्यमंत्रीपद हे भाजपकडे राहणार आहे. त्यामुळे भाजपने शिंदे यांना दोन ऑफर दिल्या आहेत. एकनाथ शिंदे यांनी केंद्रात जाण्याचा निर्णय घेतला तर राज्याच्या राजकारणातून एक्झिट घ्यावी लागणार आहे.
एकनाथ शिंदे घेणार मोठा निर्णय
राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भाजपची ऑफर नाकारणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रीपद ही नाकारणार आहेत. शिंदे हे आपल्याऐवजी इतर एखाद्या आमदाराला उपमुख्यमंत्री करू शकतात. यामध्ये मराठा अथवा मागासवर्गीय आमदाराला संधी दिली जाण्याची शक्यता आहे. केंद्रातही एकनाथ शिंदे जाणार नाही. केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यास त्यात आपल्या पक्षाच्या खासदाराला संधी देतील.
एकनाथ शिंदे काय करणार?
एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद न मिळाल्यास ते मंत्रिमंडळाच्या बाहेर राहतील आणि पक्षाचा रिमोट आपल्या हाती ठेवतील, अशी शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावर आणि त्यांच्या नेतृत्वात विधानसभेची निवडणूक लढवली गेली. शिंदे यांच्यामुळेच लोकसभेतील दारूण पराभवानंतर महायुतीला विधानसभेत जोमाने कमबॅक करता आले असा मुद्या शिंदे गटाच्या आमदारांकडून मांडण्यात येत आहे. येत्या एक-दोन दिवसात एकनाथ शिंदे आपला निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे.