Crime News : जोधपूर – 23 ऑक्टोबरला गुलामुद्दीनने अचानक जेसीबी बोलावलं आणि स्वत:च्या घराबाहेर 10 फूट खोल खड्डा खणला. संपूर्ण मोहल्ल्याने हा जेसीबी बघितला आणि खोदलेला खड्डाही, पण गुलामुद्दीनने आपल्या घराबाहेर हा खड्डा का खणला?
याबाबत कुणालाही कल्पना नव्हती. खड्डा खोदल्यानंतर तीन दिवसांनी जोधपूरमधून 50 वर्षांची महिला अनिता चौधरी गायब होते. ब्युटी पार्लर चालवणारी अनिता 26 ऑक्टोबरला तिच्या शॉपमध्ये आली पण त्यानंतर गायब झाली.
खड्डा खोदल्याच्या आणि भरल्याच्या आठ दिवसांनी म्हणजेच 31 ऑक्टोबरला रात्री जोधपूर पोलिसांची टीम गुलामुद्दीनच्या घराबाहेर पोहोचली. पोलिसांनीही त्यांच्यासोबत जेसीबी आला होता, या जेसीबीने पुन्हा एकदा खड्डा खोदण्यात आला. 10 फुटांखाली दिसलेलं दृष्यं पाहून पोलीसही हादरले. या खड्ड्यामध्ये अनिताच्या मृतदेहाचे 6 तुकडे करून पुरण्यात आले होते.
हत्येआधीच खोदला खड्डा
गुलामुद्दीनने अनिताची हत्या करण्याच्या आधीच तीन दिवस खड्डा खोदला होता. अनिताला संपवण्याचं पूर्ण प्लानिंगच गुलामुद्दीनने केलं होतं, पण त्याने ही हत्या का केली? ही मर्डर मिस्ट्री सोडवताना पोलीसही चक्रावून गेले.
जोधपूरमधल्या अग्रवाल टॉवरमध्ये सनशाईन ब्युटी पार्लर आहे, हे ब्युटी पार्लर अनिता चौधरी चालवत होत्या. 50 वर्षांच्या अनिता यांचं लग्नही झालं आहे. 26 ऑक्टोबरला अनिता घरातून ब्युटी पार्लरमध्ये आल्या, यानंतर काही वेळातच त्या शॉपमधून बाहेर गेल्या. बराच वेळ अनिता परत आल्या नाहीत, म्हणून दुकानातल्या महिला कर्मचाऱ्याने त्यांना फोन केला, पण फोनही बंद येत होता. यानंतर महिला कर्मचाऱ्याने अनिताच्या पतीला फोन केला. अनिता गायब असल्याचं समजताच पतीने शोध घ्यायला सुरूवात केली. अनेकवेळा फोन केला तरीही अनिताचा फोन स्विच ऑफ येत होता.
26 ऑक्टोबरचा पूर्ण दिवस आणि रात्रभर शोधल्यानंतरही अनिताचा पत्ता लागला नाही, अखेर 27 ऑक्टोबरला पतीने अनिता गायब असल्याची तक्रार पोलिसांना दिली यानंतर 4 दिवस पोलिसंनी शोध घेतला पण त्यांना अनिताचा थांगपत्ता लागत नव्हता. मग अचानक अनिताच्या पतीला तिची मैत्रिण सुमनचा फोन आला.
तय्यब अन्सारी नावाच्या प्रॉपर्टी डिलरने अनिताला किडनॅप केलं असेल, असा संशय सुमनने अनिताच्या पतीसमोर व्यक्त केला. तय्यब पालीला राहत होता आणि त्याचे वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांसोबतही संबंध होते. सुमनचा हा फोन अनिताच्या पतीने रेकॉर्ड केला आणि पोलिसांना याबाबत माहिती दिली. यानंतर पोलिसांनी तय्यब अन्सारीची चौकशी केली, पण पोलिसांना काहीही पुरावा मिळाला नाही.
सीसीटीव्हीमुळे सापडले धागेदोरे
चौकशी सुरू असताना पोलिसांना एक सीसीटीव्ही कॅमेराचं फुटेज मिळालं, यात अनिता ब्युटी पार्लरमधून बाहेर पडताना दिसत आहे. 26 ऑक्टोबरला दुपारी पिवळा सूट घालून अनिता एका ऑटोमध्ये बसते, कोणत्याही दबावाशिवाय अनिता स्वत:च्या मर्जीने ऑटोमध्ये बसत असल्याचं सीसीटीव्हीमध्ये दिसतं. हा सीसीटीव्ही मिळाल्यानंतर पोलिसांनी ऑटोवाल्याचा शोध घेतला. ऑटोवाल्याने आपण अनिताला 26 ऑक्टोबरला दुपारी गंगाणा भागात सोडल्याचं सांगितलं.
गंगाणामध्ये अनिताच्या ओळखीचं कोण राहतं? याचा शोध घ्यायला पोलिसांनी सुरूवात केली. अनिताचा पती आणि नातेवाईकांची चौकशी केली असता नवी कहाणी समोर आली. अनिताच्या ब्युटी पार्लरसमोर एक ड्राय क्लिनिंगचं दुकान आहे आणि या दुकानाचा मालक गुलामुद्दीन गंगाणा भागात राहतो, अशी माहिती समोर आली. अनेक वर्षांपासून अनिता आणि गुलामुद्दीनची दुकानं समोरासमोर होती, त्यामुळे दोघंही एकमेकांना ओळखत होते. ही माहिती मिळताच जोधपूर पोलिसांची टीम गुलामुद्दीनच्या गंगाणामधल्या घरी पोहोचली. गुलामुद्दीनच्या घरी पोहोचताच तो मागच्या दोन दिवसांपासून घरी नसल्याचं पोलिसांना समजतं.
गुलामुद्दीन गायब असल्याचं समजताच पोलिसांची टीम त्याचं लोकेशन शोधायला सुरूवात करते, तेव्हा एका सीसीटीव्ही कॅमेरामध्ये 29 ऑक्टोबरला गुलामुद्दीन स्कुटीवरून जोधपूर रेल्वे स्टेशनला जात असल्याचं दिसतं. गुलामुद्दीनचं असं अचानक गायब होण्यामुळे पोलिसांचा संशय वाढला. यानंतर पोलिसांनी गुलामुद्दीनची पत्नी अबिदाची चौकशी सुरू केली. सुरूवातीला उडवाउडवीची उत्तरं दिल्यानंतर अबिदाने अखेर सत्य सांगितलं. 8 दिवसांपूर्वी गुलामुद्दीनने घराबाहेर एक खड्डा खोदला आणि तो गायब झाल्याचं अबिदाने सांगितलं.
अबिदाच्या सांगण्यावरून पोलिसांनी गुलामुद्दीनच्या घराबाहेरचा खड्डा पुन्हा खणला. 10 फूट खोल खाली गेल्यानंतर पोलिसांना अनिताचा मृतदेह आढळला, ज्याचे सहा तुकडे करून पॉलिथिन बॅगमध्ये ठेवण्यात आले होते. पोलिसांना अनिताचा मृतदेह मिळाला तरी गुलामुद्दीन अजूनही गायब होता आणि त्याने अनिताची हत्या का केली? याचं कोडंही सुटत नव्हतं.
सरबत देऊन बेशुद्ध केलं
अखेर पोलिसांनी अबिदाकडूनच सगळं काही काढून घेतलं. 26 ऑक्टोबरला दुपारी ऑटोमध्ये बसून अनिता गुलामुद्दीनच्या गंगाणामधल्या घरी पोहोचली, गुलामुद्दीननेच अनिताला घरी बोलावलं होतं. घरी पोहोचताच गुलामुद्दीन आणि अबिदाने अनिताला सरबत दिलं, ज्यात बेशुद्ध व्हायचं औषध टाकण्यात आलं होतं. अनिता बेशुद्ध झाली तेव्हा गुलामुद्दीनने चाकूने भोसकून अनिताची हत्या केली. यानंतर त्याने अनिताच्या मृतदेहाचे सहा तुकडे केले. आधीच खोदलेल्या खड्ड्यात नवरा-बायकोने अनिताचा मृतदेह पॉलिथिन बॅगमध्ये टाकून पुरला. या दोघांनीही आधीच मोठ्या प्रमाणात अत्तर विकत घेतलं होतं. हे अत्तरही त्यांनी अनिताच्या मृतदेहावर टाकलं. आजूबाजूला एवढी घरं होती, तरीही कुणालाच रात्री गुलामुद्दीन आणि अबिदाने अनिताचा मृतदेह पुरल्याचं समजलंही नाही.
अनिताची हत्या का केली?
अनिता आणि गुलामुद्दीन मागची 20 वर्ष एकमेकांना ओळखत होते. समोरासमोर दुकानं असल्यामुळे दोघांची रोजच भेट व्हायची. अनिताला सोन्याचे दागिने घालण्याची हौस होती. ब्युटी पार्लरला येतानाही अनिता बरेच दागिने घालून यायची. गुलामुद्दीनला जुगाराचं व्यसन होतं, ज्यामुळे त्याच्यावर 12 लाखांचं कर्ज झालं होतं. कर्ज फेडण्याचा कोणताही मार्ग दिसत नसल्यामुळे गुलामुद्दीनने अनिताचे दागिने लुटण्याचा निर्णय घेतला.
अनिताचे दागिने लुटण्यासाठी गुलामुद्दीनने त्याची पत्नी अबिदाला विश्वासात घेतलं. अबिदाने ही कहाणी सांगितली असली तरी पोलिसांना वेगळाच संशय आहे. 26 ऑक्टोबरला अनिता जेव्हा ऑटोमध्ये बसली तेव्हा तिने कमी दागिने घातल्याचं सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. जर दागिने लुटणं हेच अनिताच्या हत्येचं कारण असेल तर दागिने घातले नसलेल्या अनिताची हत्या गुलामुद्दीनने का केली? याचा तपासही पोलीस करत आहेत. अनिताच्या हत्येनंतर गुलामुद्दीन अजूनही गायब आहे. गुलामुद्दीन जेव्हा पोलिसांच्या ताब्यात येईल तेव्हाच या मर्डर मिस्ट्रीचं गूढ उकललं जाईल.