देशाच्या राजधानी दिल्लीमध्ये भाऊबिजेच्या दिवशीच अशी घटना घडली ज्यामुळे परिसरात खळबळ माजली आहे. दिवाळीच्या आनंदाचे क्षण अवघ्या काही क्षणात आक्रोश आणि किंकाळ्यांमध्ये बदलले.
ज्या बहिणींना भावाच्या घरी सुरक्षित वाटतं त्याच घरी त्यांच्या कपाळाचं कुंकू पुसलं गेलं. दिल्लीमध्ये दोन बहिणी भाऊबिजेसाठी घरी आल्या होत्या, तेव्हा घरात दोघींच्या नवऱ्यांमध्ये वाद सुरू झाला. हा वाद इतका वाढला की थेट गोळीबार करण्यात आला ज्यात एकाचा मृत्यू झाला.
दिल्लीच्या खजुरी ठाणा भागात भाऊबिजेच्या निमित्ताने दोघी बहिणी त्यांच्या नवऱ्यांना घेऊन माहेरी आल्या होत्या. यानंतर दोन्ही साडू बिजनेसवरून एकमेकांसोबत वाद घालू लागले, यातल्या एकाने मेहुणीच्या नवऱ्याची गोळी झाडून हत्या केली. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संध्याकाळी 6 वाजून 20 मिनिटांनी खजुरी खास पोलीस स्टेशनच्या भागात गोळीबार झाल्याचा फोन आला. यानंतर पोलिसांची टीम घटनास्थळी दाखल झाली.
बंटू दिल्लीमध्ये भाड्याच्या घरात राहतो, रविवारी भाऊबीज होती म्हणून त्याच्या दोन्ही बहिणी रेखा आणि चांदनी त्यांचे पती अजय आणि हेमंतला घेऊन माहेरी आल्या. अजय आणि हेमंत माळा बनवण्याचा व्यवसाय करतात. सासरी येताच अजय आणि हेमंत यांच्यात व्यवसायावरून वाद सुरू झाले, यानंतर अजयचा तोल सुटला आणि त्याने हेमंतवर गोळी झाडली, यानंतर अजय घटनास्थळावरून फरार झाला.
गोळी लागल्यानंतर 35 वर्षांच्या हेमंतला उपचारासाठी जेपीसी रुग्णालयात नेण्यात आलं, जिकडे त्याचा मृत्यू झाला. अजयने हेमंतच्या डोकं आणि छातीवर गोळी मारली होती, त्यामुळे डॉक्टरांनाही हेमंतला वाचवण्यात यश आलं नाही. आरोपी अजय अजूनही पोलिसांच्या ताब्यात आलेला नाही, त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत.