Manoj Jarange Patil

‘मनोज जरांगे यांच्या रुपात भारताला एक गांधी मिळणार’, मुस्लिम वक्फ बोर्डाचे प्रवक्ते सज्जाद नोमानी यांचा दावा


मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांची आज मुस्लिम आणि बौद्ध धर्माच्या धर्मगुरुंसोबत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत विधानसभा निवडणुकीला एकत्र सामोरं जायचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीनंतर मनोज जरांगे पाटील आणि दोन्ही धर्माच्या धर्मगुरुंनी एकत्रित पत्रकार परिषद घेतली.

यावेळी त्यांनी बैठकीत नेमका काय निर्णय घेण्यात आला? या विषयी सविस्तर माहिती दिली. मनोज जरांगे पाटील येत्या 3 नोव्हेंबरला उमेदवारांची घोषणा करणार आहेत. आपण सांगू त्या उमेदवाराला निवडून आणायचं, असं आवाहन मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला केलं आहे. यावेळी मुस्लिम वक्फ बोर्डाचे प्रवक्ते सज्जाद नोमानी यांनी मोठा दावा केला. “मनोज जरांगे पाटील यांच्या रुपात भारताला एक गांधी मिळणार आहे”, असं वक्तव्य सज्जाद नोमानी यांनी केलं.

 

“जरांगे मला मराठी शिकवतील. पण ते मला मराठी शिकवतील. केवळ हिंदी बोलता येत नसल्याने जरांगे हरियाणात गेले नाही. त्यांना तिकडून बोलणं आलं होतं. त्यांना इतर ठिकाणीही बोलावलं होतं. मी आता त्यांच्यासोबत देशभर जाईल. त्यांचं मराठी भाषण हिंदीत अनुवादीत करणार आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या रुपात भारताला एक गांधी मिळणार आहे. पाटील यांच्या रुपात भारताला नवे बाबासाहेब आंबेडकर मिळणार आहेत. पाटील यांच्या रुपात नवे मौलाना आझाद मिळणार आहे”, असं मोठं वक्तव्य सज्जाद नोमानी यांनी केलं.

 

‘देशात फूट पाडणाऱ्या ताकद’

“देश कठीण परिस्थितीतून जात आहे. अनेक आव्हाने आहेत. देशातील लोक विभाजीत झाले तर विदेशी ताकदीचा मुकाबला करता येणार नाही. देशात फूट पाडणाऱ्या ताकद आहेत. त्या सत्तेत आहेत. त्या विदेशी शक्तीच्या एजंट आहेत. त्यांच्या इशाऱ्यावर देशाला विभाजित केलं जात आहे. फोडा आणि राज्य कराचा जुनाच फॉर्म्युला वापरला जात आहे. महाराष्ट्र हे देशातील महत्त्वाचं राज्य आहे. आर्थिक राजधानी इथेच आहे. पण राज्यातील भांडवल गुजरातला नेलं जात आहे. हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा सवाल आहे. राज्याचा इतिहास प्रेम आणि सद्भावनेचा आहे. शिवाजी महाराजांच्या तोफखान्याचे इनचार्ज इब्राहीम खान होते”, असं सज्जाद नोमानी म्हणाले.

 

“भाजप आणि संघाने धर्माच्या नावावर वाद निर्माण केले. सर्व धर्माच्या विरोधात जाऊन त्यांनी देशवासियांमध्ये फाळणी केली. गेल्या ४० वर्षापासून मी संपूर्ण देशात गरीब, मुस्लिम, एससी एसटी, महिला, शेतकरी या सर्वांना मी एकत्र करण्याचा प्रयत्न करत आहे”, असंही ते यावेळी म्हणाले.

 

‘अदानी आणि अंबानींना सर्व दिलं जातं’

“सर्वाधिक आत्महत्या करणारे शेतकरी महाराष्ट्रात आहे. अदानी आणि अंबानींना सर्व दिलं जात आहे. शेतकरी उपाशी मरत आहे. देशातील ज्या खऱ्या समस्यांवर तोडगा काढण्याऐवजी कधी मंदिर, कधी मशीद तर कधी ख्रिश्चनांचा विषय काढला जात आहे. आज एक दलित व्यक्ती घोड्यावर बसून त्याची वरात काढू शकत नाही ही देशाची परिस्थिती आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात सर्वधर्म समभाव आणि समतेचा विचार मांडला. संविधानात बंधुत्व दिलं आहे. मी कायदाचा विद्यार्थी होतो. मी अमेरिका आणि इतर देशाचे संविधान वाचले आहे. सर्व देशात मी फिरलो आहे. पण भारतासारखं संविधान मी कुठे पाहिलं नाही”, असं सज्जाद नोमानी म्हणाले.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *