जगन्नाथपुरी मंदिरातील रत्न भांडार तब्बल 46 वर्षांनंतर मोजणीसाठी उघडण्यात आलं. हायकोर्टातील माजी न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालील समिती जेव्हा रत्नांचं भांडार उघडण्यासाठी आली तेव्हा पुरीच्या महाराजांनाही बोलवण्यात आलं होतं.
कारण, पुरीचे महाराज जगन्नाथ मंदिराचे मुख्य सेवक आहेत. गजपती दिव्यसिंह देव (चतुर्थ) हे पुरीचे सध्याचे महाराज आहेत. गजपती ही एक पदवी असून 15 व्या शतकापासून ती पुरीच्या महाराजांसाठी वापरली जात आहे.
गजपती दिव्यसिंह देव (चतुर्थ) हे भोई घराण्यातील आहेत. 1970 मध्ये त्यांचे वडील महाराजा बिरकिशोर देव यांचं निधन झालं तेव्हा 17 वर्षांचे दिव्यसिंह गादीवर बसले. गजपती दिव्यसिंह यांचं सुरुवातीचं शिक्षण पुरीतील कॉन्व्हेंट स्कूलमध्ये झालं. पुढील शिक्षण त्यांनी छत्तीसगड आणि दिल्लीत पूर्ण केलं. त्यांनी प्रसिद्ध सेंट स्टीफन्स कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि इतिहास विषयात पदवी घेतली. 1975 मध्ये त्यांनी दिल्ली युनिव्हर्सिटीतून लॉ पूर्ण केलं. अमेरिकेतील नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन त्यांनी एलएलएमची पदवी घेतली.
पुरीचे महाराज गजपती दिव्यसिंह देव (चतुर्थ) हे जगन्नाथ मंदिराचे मुख्य सेवक आणि व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आहेत. ते जगन्नाथपुरीशी संबंधित सर्व धार्मिक विधींचं नेतृत्व करतात. रथयात्रेदरम्यान रथांची प्रतिकात्मक साफसफाईचा समावेश असलेल्या ‘छेरा पहारा’ विधीमध्ये ते सर्वात अगोदर सहभागी होतात. ते श्री जगन्नाथ तत्त्व, गबेशन, प्रसार उप-समिती यांसारख्या विद्वानांच्या गटाचं नेतृत्व करतात.
जगन्नाथपुरीची स्थापना 1150 मध्ये गंगा राजवंशाच्या काळात झाली. त्यावेळी राजा चोडगंगा सिंहासनावर होते. त्यांनीच मंदिराचा पाया घातला. 1161 मध्ये मंदिर पूर्ण झालं. अनेक ऐतिहासिक दस्तऐवजांवरून असं दिसून येतं की, राजा चोडगंगाने आपल्या कारकिर्दीत पुरीचा ‘जगमोहन’ आणि ‘विमान’ भाग बांधला. त्यांनी मंदिराच्या उभारणीसह प्रचंड देणग्याही दिल्या. त्यात सोन्याचे हत्ती, घोडे, मौल्यवान रत्ने, भांडी आणि फर्निचर यांसारख्या वस्तूंचा समावेश होता. त्यांच्यानंतर राजा भीमदेव सिंहासनावर आले. उरलेल्या भागाचं बांधकाम त्यांनी करून घेतलं. राजा भीमदेवाच्या वारसांनीही पुरीच्या सौंदर्यीकरणात कोणतीही कसर सोडली नाही.
कसा आहे पुरीचा खजिना ?
जगन्नाथ मंदिरातील रत्न भांडार, बाह्य कक्ष आणि अंतर्गत कक्ष अशा दोन भागांमध्ये विभागलं गेलं आहे. देवाच्या दागिन्यांसारख्या सतत लागणाऱ्या वस्तू बाह्य कक्षात ठेवल्या जातात. आतील कक्षात सोन्याच्या पेट्या आढळल्या आहेत. आतापर्यंत सापडलेल्या खजिन्याची किंमत 100 कोटींपेक्षा जास्त असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.