क्राईम

‘सेफ हाऊस’मध्ये काय घडायचं?,आजार घालवणाऱ्या भोले बाबाच्या दुनियेचं सत्य काय?


उत्तर प्रदेशातील हाथरस येथील एका सत्संगात चेंगराचेंगरी होऊन 123 भाविकांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत अनेकजण गंभीर जखमी झाले. या सर्वांचा वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार पुरुष आणि दोन महिला अशा सहा लोकांना अटक केली आहे.

मात्र, अद्यापपर्यंत बाबा नारायण साकार विश्व हरी ऊर्फ भोलेबाबावर अजूनही कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. गरज पडली तर भोले बाबांची चौकशी केली जाईल, असं पोलीस सांगत आहेत. मात्र, भोले बाबा नेमका कुठं आहे हे पोलिसांनाही माहीत नाही. पोलिसांनी त्याच्या आश्रमावर मध्यरात्री छापाही मारला पण भोले बाबा काही सापडलेला नाही. मात्र, या बाबाच्या चमत्काराचे नवीन नवीन खुलासे होताना दिसत आहेत.

 

देशातील साधू संत हे भगवे वस्त्र परिधान केलेले किंवा पांढऱ्या शुभ्र वस्त्रात दिसतात. पण नारायण साकार हरी ऊर्फ भोले बाबा हा नेहमी सुटबुटात असायचा. तो सत्संगात सूटबुट आणि टाय घालून यायचा. तसेच डोळ्यावर नेहमी रंग बिरंगी गॉगल्स लावून यायचा. या बाबाच्या गॉगल्सचे अनेक रहस्य आहेत. भोले बाबा प्रत्येक मंगळवारी रंगीत गॉगल्स लावायचा. या गॉगल्सद्वारे दिव्य दृष्टीने लोकांना बरं करण्याचा तो दावा करायचा आणि लोकही त्याच्यावर विश्वास ठेवायचे.

रहस्य काय?

भोले बाबाच्या गॉगल्सची वेगवेगळी कहाणी सांगितली जाते. निळ्या रंगाच्या गॉगल्सद्वारे आजारी लोकांना दिव्यदृष्टीने तो बरा करत असल्याचं सांगितलं जातं. हिरव्या रंगाच्या गॉगल्सद्वारे भूतप्रेत उतरवण्याचा त्याचा दावा आहे. ज्यांच्या आयुष्यात बरं चालेलं नाही, अशांच्या आयुष्यात शांती निर्माण करण्यासाठी बाबा ब्राऊन आणि काळ्या रंगाचा गॉगल लावायचे. तर इतर दिवशी बाबा नंबरचा चष्मा लावायचे. जेव्हा बाबा डोळ्यावरून गॉगल्स काढायचे तेव्हा त्यांच्या दिव्यदृष्टीने लोकांचे आजार बरे व्हायचे, असं भक्तांचं म्हणणं आहे. बाबाचे सेवादार आधी आजारी लोकांना हेरून त्यांना सर्वात पुढे बसवायचे.

चॅरिटेबल ट्रस्टमध्ये महिलांचा भरणा

हा बाबा एटा जिल्ह्यातील कासगंजच्या पटियालीच्या बहादूरनगरचा रहिवासी आहे. या गावात बाबाचं येणंजाणं अत्यंत कमी आहे. बाबाचं जन्मस्थळ म्हणून हे बहादूरनगर प्रसिद्ध आहे. या ठिकाणी रोज भक्तांची मोठी गर्दी असते. या ठिकाणीही बाबाचं मोठं साम्राज्य आहे. बहादूरनगरमध्ये बाबाचा चॅरिटेबल ट्रस्ट आहे. या ट्रस्टमध्ये शेकडो लोक काम करतात. या ठिकाणी बाबाची 20 ते 25 एकर जमीन आहे. या ठिकाणी शेती केली जाते. या ट्रस्टमध्ये महिला मोठ्या संख्येने सेवादार म्हणून काम करतात. उत्तर प्रदेशातील नोएडा येथेही बाबाचा आश्रम आहे.

सेफ हाऊसमध्ये काय घडतं?

विशेष म्हणजे आजार बरा करताना बाबा कुणाकडूनही काहीच घेत नाही. कोणतीही दक्षिणा घेत नाही. तरीही बाबाचं जागोजागी साम्राज्य वाढलेलं आहे. अनेक एकर जमीन बाबाच्या नावावर आहे. यापूर्वी हा स्वयंभू बाबा आग्र्यातील एका छोट्या घरात राहायचा. त्या घराला आता मंदिराचा दर्जा देण्यात आला आहे. आता त्या घराला कुलूप लावण्यात आलं आहे. या घराला कुटिया म्हटलं जातं. परंतु, आजूबाजूच्या मते बाबांचं हे सेफ हाऊस आहे. या ठिकाणी बाबा नेहमी येतो आणि आराम करतो. नाही तर या घराला टाळा लावलेला असतो.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *