इराण आणि पाकिस्तान पुन्हा एकदा आमनेसामने,सुन्नी मुस्लिम दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 11 इराणी सुरक्षा दलांचा मृत्यू
पाकिस्तानला लागून असलेल्या इराणच्या दक्षिण-पूर्व भागात इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सच्या मुख्यालयावर सुन्नी मुस्लिम दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 11 इराणी सुरक्षा दलांचा मृत्यू झाला आहे.
इराणच्या बॉर्डर गार्ड्सच्या चाबहार आणि रस्क येथील रिव्होल्युशनरी गार्ड्स (IRGC) तळांना लक्ष्य करण्यात आल्याचे इराणचे गृह उपमंत्री माजिद मिरहमदी यांनी गुरुवारी सांगितले. दोन्ही तळ सिस्तान आणि बलुचिस्तान प्रांतात आहेत. सिस्तान-बलुचिस्तान हा अफगाणिस्तान-पाकिस्तानला लागून असलेला प्रदेश आहे. या दहशतवादी हल्ल्यानंतर दोन शेजारी इस्लामिक देश म्हणजेच इराण आणि पाकिस्तान पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत.
इराणच्या सरकारी माध्यमांनी सांगितले की, चाबहार आणि रस्क या शहरांमध्ये दहशतवादी संघटना जैश अल-अदल गट आणि इराणच्या सुरक्षा दलांमध्ये रात्रभर चकमक झाली. “इराणी सैन्याने दहशतवाद्यांना चाबहार आणि रस्क येथील गार्ड मुख्यालयावर कब्जा करण्यापासून रोखले आणि त्यांचे मनसुबे उधळून लावले,” असे गृह उपमंत्री मंत्री माजिद मिरहमदी यांनी सांगितले.
दरम्यान, इराणमधील मृतांचा आकडा डिसेंबरमध्ये झालेल्या हल्ल्याइतकाच आहे. जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेने डिसेंबरमध्येही अशा हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. त्यानंतर इराणने शेजारील पाकिस्तानवर टीट फॉर टॅट रणनीतीनुसार हवाई हल्ले केले. हे हल्ले त्याच सिस्तान-बलुचिस्तान प्रांतात झाले, ज्याने वर्षानुवर्षे अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळ्या, बलुची अल्पसंख्याक बंडखोर आणि सुन्नी मुस्लिम अतिरेकी यांच्या हल्ल्यांचा सामना केला.
दुसरीकडे, इराणने या घटनेला दहशतवादी हल्ला असल्याचे म्हटले होते. प्रत्युत्तरादाखल केलेल्या हल्ल्यात तीन दहशतवादी ठार तर एक जखमी झाल्याचे इराणच्या सरकारी माध्यमांनी सांगितले होते. सरकारी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी चाबहारमधील एका पोलीस ठाण्यावरही हल्ला केला. जैश अल-अदल गटाने गेल्या काही वर्षांत इराणी सैन्यावर सुमारे डझनभर छोटे-मोठे हल्ले केले आहेत. गेल्या वर्षी डिसेंबरमध्येही पाकिस्तानमध्ये फोफावत असलेल्या जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेने सिस्तान-बलुचिस्तान भागात इराणच्या लष्करी दलांवर हल्ला केला होता
दहशतवादी संघटनेचे दहशतवादी सीमा ओलांडून इराणमध्ये घुसतात आणि तेथील सुरक्षा कर्मचाऱ्यांची हत्या करतात, असा आरोप इराण दीर्घकाळापासून करत आहे. जैश अल-अदल हा सुन्नी दहशतवादी गट आहे. ही संघटना स्वत:ला इराणच्या सिस्तान-बलुचिस्तान प्रांतातील सुन्नी हक्कांचे रक्षक असल्याचे सांगते. आता रमजान महिना सुरु असताना सुन्नी दहशतवादी गटाच्या कारवायांवरुन दोन्ही देश पुन्हा आमनेसामने आले आहेत.