आगळे - वेगळेराजकीय

तळीरामांचा आनंद गगनात मावेना, निवडून आल्यास मतदारांना आनंदाच्या शिध्यात व्हिस्की आणि बिअर देणार


आगामी लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून देशातील राजकीय पक्षाने कंबर कसली आहे. आपपल्या उमेदवारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवार मतदारांवर अश्वासनांचा वर्षाव करताना दिसत आहेत.

याच पार्श्वभूमीवर चंद्रपूर मतदारसंघातून उभ्या असलेल्या अखिल भारतीय मानवता पक्षाच्या उमेदवार वनिता राऊत यांनी आपल्या मतदारांना दिलेल्या अश्वासनाची जोरदार चर्चा रंगली आहे. निवडून आल्यास मतदारांना आनंदाच्या शिध्यात व्हिस्की आणि बिअर देणार असल्याचे त्यांनी अश्वासन दिले.

वनिता राऊत म्हणाल्या की, “फक्त श्रीमंतांनीच महागडी व्हिस्की आणि बिअर का प्यावी? देशी पिणाऱ्या गरिबांनादेखील कधी- कधी चांगली दारू प्यायला मिळावी. निवडून आल्यास चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील मतदारांना आनंदाच्या शिध्यात व्हिस्की आणि बिअर दिले जाणार”, असे आश्वासन वनिता यांनी दिले. यापूर्वी, २०१९ मध्ये देखील वनिता राऊत यांनी चिमूर विधानसभेची निवडणूक लढवली. त्यावेळी देखील त्यांनी गाव तिथे दारूचे दुकान असे भन्नाट आश्वासन दिले होते.

२०१९ विधानसभा निवडणुकीचा प्रचार करताना वनिता म्हणाल्या होत्या की, “चंद्रपूरलगतच्या नागपूर जिल्ह्यात दारू बंदी नाही. मग चंद्रपुरातील नागरिकांनी काय वाईट केले हे, ज्यांना दारूबंदीसारखे निर्बंध घालण्यात आले. चंद्रपुरातील दारूबंदी उठवल्यानंतर नागरिकांना रोजगार मिळेल”, असा दावा त्यांनी केला होता.

मात्र चंद्रपूरकरांनी त्यांच्या या आश्वासनाला फार दाद दिली नाही. या निवडणुकीत त्यांना पराभव स्वीकरावा लागला होता.

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आहेत. तर, भाजपने सुधीर मुनगंटीवार यांच्यावर विश्वास दाखवला आहे. धानोरकर आणि सुधीर मुनगंटीवार यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळत असताना अखिल भारतीय मानवता पक्षाच्या उमेदवार वनिता राऊत यांच्या आश्वासनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *