धर्मशास्त्रात आचरणाविषयी काही नियम सांगितले गेले आहेत. या नियमांचं पालन केलं तर संबंधित व्यक्तीला जीवनात सुख-समृद्धी, पैसा, यश आदी बाबी मिळू शकतात. सामान्यतः हात-पायाच्या बोटांची नखं वाढली, की आपण ती कापतो.
खरं तर आरोग्याच्या दृष्टीने ही महत्त्वाची गोष्ट आहे. धर्मशास्त्रात नखं कापण्याविषयी काही नियम सांगितले आहेत. हिंदू धर्मात सूर्यास्तानंतर नखं कापणं अशुभ मानलं जातं. या गोष्टीचा थेट संबंध धन अर्थात आर्थिक बाबींशी जोडला गेला आहे. आठवड्यात कोणत्या दिवशी नखं कापावीत आणि कोणत्या दिवशी कापू नयेत, याविषयीची माहिती शास्त्रांमध्ये दिली आहे. ती सविस्तर जाणून घेऊया.
रात्रीच्या वेळी नखं कापू नयेत, असा सल्ला घरातल्या ज्येष्ठ व्यक्ती देताना आपण ऐकतो. याशिवाय मंगळवार, गुरुवारसह इतर ठरावीक दिवशी नखं, केस कापू नयेत असं सांगितलं गेलं आहे. हिंदू धर्मात सूर्यास्तानंतर आणि आठवड्यातल्या काही ठरावीक दिवशी नखं, केस कापणं वर्ज्य आहे. यामुळे देवी-देवता नाराज होतात आणि संबंधित व्यक्तीला जीवनात आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतो, असं मानलं जातं. योग्य वेळी आणि दिवशी नखं कापली तर लक्ष्मी मातेची कृपादृष्टी प्राप्त होते. हिंदू धर्माप्रमाणेच इस्लाममध्येही नखं कापण्याची सुन्नत पद्धत सांगितली आहे. हिंदू धर्मात रात्रीच्या वेळी नखं कापणं निषिद्ध आहे. रात्री नखं कापली तर दारिद्र्य येतं असं मानलं जातं.
सोमवारी नखं कापली तर तमोगुण नष्ट होतात. त्यामुळे या दिवशी नखं आणि केस कापू शकता. मंगळवारी नखं कापणं निषिद्ध आहे. ज्या व्यक्ती श्री हनुमानाची आराधना करतात, त्यांनी या दिवशी नखं कापू नयेत. ज्योतिषशास्त्रानुसार, मंगळवारी नखं कापली तर कर्जापासून मुक्ती मिळते. बुधवारी नखं कापणं शुभ मानलं जातं. या दिवशी नखं कापली तर धनलाभ होतो, नोकरी व्यवसायात प्रगती होते आणि उत्पन्न वाढते. गुरुवार हा भगवान विष्णूला समर्पित आहे. या दिवशी नखं कापली तर दुर्भाग्य वाढतं. शुक्रवारी नखं कापावीत. या दिवशी नखं कापणं शुभ मानलं जातं. यामुळे लक्ष्मीमाता प्रसन्न होते. शुक्र ग्रहाच्या कृपेमुळे सौंदर्य वाढतं. जीवनात धन, सुख-समृद्धी आणि सौंदर्य वाढतं.
शनिवारी नखं कापावीत की नाही याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम असतो. ज्योतिषशास्त्रानुसार, शनिवारी नखं कापल्यास शनिदेव नाराज होतात. त्यामुळे जीवनात दारिद्र्य, मानसिक, शारीरिक समस्या येऊ शकतात. रविवारी नखं कापू नयेत. कारण हा दिवस नखं कापण्यासाठी अशुभ मानला गेला आहे. रविवारी नखं कापल्यास आत्मविश्वास कमी होतो, यशात अडथळे येतात. तसंच आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होतो. बहुतांश जण रविवार हा सुट्टीचा दिवस असल्याने नखं, केस कापतात; पण हे कदापि करू नये.