“.तर मुस्लीमांच्या आरक्षणासाठीही लढेन”, मनोज जरांगे पाटलांच्या वक्तव्यावर केतकी चितळे . . .
सोशल मीडियावर अनेकदा चिथावणीखोर भाष्य करत कायम चर्चेत राहणारी अभिनेत्री म्हणजे केतकी चितळे. केतकी अनेकदा तिच्या वादग्रस्त व्यक्तव्यांमुळे वादाचे कारण बनली आहे. अशातच सध्या महाराष्ट्रभर सुरू असलेल्या मराठा आरक्षणावरुनही ती चर्चेत आली आहे.
महानगरपालिकेचे कर्मचारी मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षणासाठी गेले असताना केतकीने त्यांच्याशी हुज्जत घातली. तसेच आरक्षणाबाबत काही वादग्रस्त वक्तव्येही केली. सोशल मीडियावर तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले होते.
यावेळी केतकीने महापालिकेच्या महिला कर्मचाऱ्याला जाब विचारला होता. अभिनेत्रीने स्वत: मोबाइलमध्ये हा व्हिडीओ काढत “तुम्ही मराठा म्हणजे माझ्यावर अॅट्रॉसिटी टाकणार नाहीत. मी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण आहे. संविधान आणि कायदा सर्वांसाठी समान नाही. जातींवर आधारित कायदे बनवले जात आहेत.” असे म्हटली होती. यावरून तिच्यावर अनेक प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या होत्या. अशातच तिने नुकतेच मनोज जरांगे पाटील यांच्या एका वक्तव्यावर पोस्ट शेअर केली आहे.
मराठा समाजाच्या मागण्या मान्य होताच मनोज जरांगे पाटील यांनी “धनगर आणि मुस्लीम बांधवांनी मागणी केल्यास त्यांच्याही आरक्षणासाठी मी लढा देईल.” असं म्हटलं होतं. मनोज जरांगे पाटलांचे हे वक्तव्य केतकीने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलं आहे आणि त्यावर “आता कसे, खरे रूप दिसले. मुखवटा फार काळ टिकत नाही. यांना सनातनींमध्ये फूट पाडायची आहे. आता तरी जागे व्हा.” असं म्हटलं आहे.
तसेच या पोस्टखाली तिने ‘Uniform Criminal Law’ असंही म्हटलं आहे. दरम्यान, केतकीची ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत असून तिच्या या नवीन वक्तव्याने पुन्हा नवीन वाद उभा राहणार का? असा प्रश्न पडला आहे