ताज्या बातम्या

स्वयंपाक करताना गॅस सिलिंडरचा भडका उडाला; मनसेच्या शहराध्यक्षा गंभीर जखमी


स्वयंपाक करीत असताना गॅसच्या गळतीमुळे किचनमध्ये अचानक आग लागली. या आगीत कल्याण येथील मनसेच्या महिला शहराध्यक्षा गंभीर जखमी झाल्या आहेत. कुटुंबियांनी त्यांना तातडीने उपचारासाठी ऐरोली येथील रुग्णालयात दाखल केलं आहे. शीतल विखणकर असं जखमी झालेल्या मनसे महिला पदाधिकाऱ्याचं नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शीतल विखणकर या कल्याण खडकपाडा परिसरातील कल्पेश अपार्टमेंट मध्ये राहतात. शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास त्या नेहमीप्रमाणे किचनमध्ये स्वयंपाक बनवत होत्या. त्यांचे कुटुंबीय समोरील हॉलमध्ये गप्पा मारीत होते.

दरम्यान, स्वयंपाक सुरू असताना अचानक गॅस बंद झाला. यानंतर शीतल यांनी पुन्हा लायटरने गॅस पेटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, क्षणात आगीचा भडका उडाला आणि या आगीत शीतल गंभीर जखमी झाल्या. घरात आरडाओरड होताच कुटुंबातील इतर सदस्यांनी किचनच्या दिशेने धाव घेतली.

किचनमध्ये लागलेली आग कुटुंबियांनी कशीबशी विझवली. त्यानंतर जखमी अवस्थेत असलेल्या शीतल यांना उपचारासाठी ऐरोली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. शीतल यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं जातंय.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *