पाकिस्तान गेल्या काही दिवसांपासून आर्थिक संकटात अडकला आहे. दररोज लागणाऱ्या साहित्यांचे दर गगनाला भिडले आहेत. ही महागाई कमी करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे, यात आता उपासमारीची परिस्थितीही वाढताना दिसत आहे.
यावर नियंत्रण आणण्यासाठी लष्कर मोठी मदत करणार आहे. पाकिस्तानी लष्कर आता शेती करणार आहेत. पाकिस्तानच्या दक्षिण वझिरीस्तानमधील झरमलम भागात लष्कर ४१ हजार एकर जमिनीवर शेती करणार आहे.
सुरुवातीला फक्त १००० एकर जमिनीवर लष्कराकडून शेती केली जाईल, पण नंतर ती वाढवून ४१ हजार एकर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. कालांतराने अन्न स्वयंपूर्णतेला चालना मिळेल, असा दावा त्यांनी केला आहे. अन्नधान्य वाढवून परकीय चलनाचा साठा वाढवता येईल, असेही लष्कराला वाटते. धान्य पिकवल्याने पाण्याची बरीच बचत होईल. यामुळे महागाईला ब्रेक बसेल, असे लष्कराला वाटते.
पाकिस्तान लष्कर ज्या जमिनीवर ही शेती करणार आहे, त्या जमिनीचे मालकी हक्क फक्त प्रांतीय सरकारकडेच राहतील. लष्कराला कोणत्याही प्रकारचा नफा मिळणार नसल्याचेही सांगण्यात आले आहे. ३० वर्षांच्या कालावधीत पाकिस्तानी लष्कर धान्याव्यतिरिक्त ऊस, कापूस आणि गहू पिकवणार आहे. याशिवाय भाजीपाला आणि फळांचीही लागवड होणार आहे.