पैठण : पैठण एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कारकीन येथे पती-पत्नीच्या झालेल्या वादातून पतीने पत्नीचा खून केला. खून करून पळून जात असताना आरोपी पतीला पोलिसांनी जेरबंद केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पैठण एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कारकीन येथील आतिष रावसाहेब ताकवले (वय २५) याचा आपल्या पत्नी सोनाली आतिष ताकवले (वय २२) हिच्यासोबत आज दुपारी वाद झाला. या वादातून पती आतिष ताकवले यांनी आपल्या पत्नीवर कुऱ्हाडीने गळ्यावर व पोटावर तीन ते चार वार केल्यामुळे पत्नी सोनाली रक्ताच्या थारोळ्यात कोसळली. बेशुद्ध पडल्याचे लक्षात येताच तो पळून जाऊन लागला. यावेळी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे जमादार राजेश चव्हाण यांनी या आरोपीला तत्काळ ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सिद्धेश्वर भोरे, सपोनि निलेश खेळे, जमादार करतासिंग सिंगल यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. पुढील तपास पोलीस करत आहेत. मृत महिलेला एक मुलगी असून तिचे माहेर सावखेडा (ता. गंगापूर) येथील आहे.