राज्याच्या विकासासाठी अकरा सूत्री कार्यक्रम : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
छत्रपती संभाजीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 73 व्या वाढदिवसानिमित्त अकरा सूत्री कार्यक्रम हाती घेण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केली.
नमो महिला सशक्तीकरण अभियानाला मंजुरी
मंत्रिमंडळाच्या बैठकीत महिला सशक्तीकरण अभियानाला मंजुरी देण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 73 लाख महिलांना शासकीय योजनांचा लाभ आम्ही देणार आहोत. त्यावर आम्ही निर्णयही घ्यायला सुरुवात केली आहे. याखेरीज नमो कामगार कल्याण योजनेअंतर्गत 73 हजार बांधकाम कामगारांना सुरक्षा देण्यासोबतच त्यांच्या मुलांची शिष्यवृत्ती योजना यावर सध्या काम सुरू आहे, असे ते म्हणाले.
गडकिल्ल्यांचे संरक्षण करणार
जनतेचे जीवनमान उंचावण्यासाठी उद्यान, चांगले रस्ते, फूटपाथ तयार करणार आहे. मुंबई, ठाण्यासारखे शहरांचे सौंदर्यीकरण झाले पाहिजे. त्यासाठी अनेक लोकांची मदत होईल. गडकिल्ल्याचे संरक्षण करण्यासाठी पुढाकार घेतला जाणार आहे. महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांत आणि तालुक्यांमध्ये ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात 73-73 ग्राम सचिवालय उभारण्याबद्दल निर्णय कॅबिनेटमध्ये घेण्यात आल्याचे ते म्हणाले.
पटोलेंना गांभीर्याने घेत नाही
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांना मुख्यमंत्र्यांनी उपोषणाला बसविले होते, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. त्याबद्दल विचारले असता, पटोले यांना कोणीच गांभीर्याने घेत नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले. इतर कुठल्याही समाजावर अन्याय न करता मराठा आरक्षण मिळू शकते, याबद्दल खात्री पटल्यामुळे जरांगे यांनी उपोषण मागे घेतले. आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे यापूर्वीच घेण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव हे नामकरण राज्याने केंद्राकडून संमती मिळून कायदेशीर बाबी पूर्ततेने केले आहे. त्यामुळे दोन्ही शहरांच्या नामकरणाचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला आहे. आता जे आरोप करत आहेत, त्यांना अल्पमतात सरकार असताना कॅबिनेट घ्यायचा अधिकार होता की नव्हता, याचीही माहिती घ्यावी. सरकार अल्पमतात आल्यानंतर नामकरणाचा निर्णय घेता येत नाही. अडीच वर्षे हा निर्णय घ्यायला कोणी हात बांधले होते का, असा सवाल त्यांनी विरोधकांना विचारला.
असा आहे 11 सूत्री कार्यक्रम
महिला सशक्तीकरण : 73 लाख महिलांना शासकीय योजनांचा लाभ.
नमो कामगार कल्याण : 73 हजार बांधकाम कामगारांना सुरक्षा संच.
नमो शेततळी : 73 हजार शेततळ्यांची उभारणी
नमो आत्मनिर्भर व सौरऊर्जा गाव : 73 गावे आत्मनिर्भर करणार
नमो गरीब व मागासवर्गीय सन्मान : वस्त्यांचा सर्वांगीण विकास
नमो ग्राम सचिवालय : प्रत्येक जिल्ह्यांत 73 ग्रामपंचायत कार्यालयांची उभारणी.
नमो आदिवासी स्मार्ट शाळा : स्मार्ट शाळांची उभारणी.
नमो दिव्यांग शक्ती : दिव्यांग पुनर्वसन केंद्र उभारणार.
नमो क्रीडा मैदान व उद्यान : सुसज्ज क्रीडा मैदाने व उद्यानांची उभारणी.
नमो शहर सौंदर्यीकरण : 73 शहरांमध्ये शहर सौंदर्यीकरण प्रकल्प
नमो तीर्थस्थळ व गडकिल्ले संरक्षण : 73 पवित्र व ऐतिहासिक धार्मिक स्थळांची सुधारणा.