कंत्राट रद्द, चौकशीचे काय झाले स्ट्रीट फर्निचर घोटाळय़ात आयुक्तांची चौकशी होणार का? आदित्य ठाकरे यांचा सवाल
महापालिकेतील स्ट्रीट फर्निचर घोटाळा उघड केल्यामुळे सरकारने हे कंत्राट रद्द केले असले तरी या घोटाळ्याच्या चौकशीचे नेमके काय झाले, असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते युवा सेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
या टेंडरमधील दरनिश्चिती ‘कॉम्पिटिटिव्ह अॅथोरिटी’ने केल्याचे उत्तर पालिकेने दिले होते. म्हणजेच आयुक्तांनी ही दरनिश्चिती केली का असा सवाल करीत आयुक्त या चौकशीला सामोरे जाणार का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. याबाबत त्यांनी पालिका आयुक्त प्रशासक इकबाल सिंह चहल यांना पत्र देऊन प्रश्नही उपस्थित केले आहेत. याची उत्तरे दिली नाही तर मला माझ्या विशेषाधिकाराचा वापर करावा लागेल असा इशाराही त्यांनी दिला आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या स्ट्रीट फर्निचर प्रकल्पात 263 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप करीत आदित्य ठाकरे यांनी या घोटाळ्याच्या चौकशीची मागणी केली होती. 1 जुलै रोजी शिवसेनेने महापालिकेवर काढलेल्या प्रचंड मोर्चाप्रसंगीही याबाबत त्यांनी पालिकेला जाब विचारला होता. यानंतर नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनादरम्यान सरकारने हे पंत्राट रद्द करीत असल्याची घोषणा केली होती. मात्र कंत्राट रद्द केले की स्थगित केले, याबाबत सरकारने स्पष्ट भूमिका मांडावी आणि या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी करीत राज्यपाल रमेश बैस यांना पत्रही दिले होते. सखोल चौकशी झाल्यास मिंधे सरकार उघडे पडले यामुळेच हे कंत्राट रद्द करण्यात आल्याचा आरोपही आदित्य ठाकरे यांनी केला होता. दरम्यान, या घोटाळ्याच्या चौकशीचे काय झाले, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी पुन्हा आयुक्तांना पत्र देऊन उपस्थित केला आहे.
या प्रश्नांची उत्तरे द्या
– स्ट्रीट फर्निचर घोटाळ्याच्या चौकशी कोणत्या पद्धतीने होत आहे.
– तपासणी बाहेरील संस्था, कायदेशीर की पालिका अधिकाऱ्याकडून?
– टेंडर प्रक्रिया झालेल्या डीएसीची विभागीय चौकशी होणार का?
– दरांबाबत शहरी नियोजक, डिझायनरची चौकशी होणार का?
– समितीचा भाग म्हणून सहाय्यक आयुक्त चौकशीचा भाग असणार?