अहमदनगर, साहेबराव कोंकणे : काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बंड करत महायुतीला पाठिंबा दिला. त्यांनी राष्ट्रवादीच्या आठ नेत्यांसह मंत्रिपदाची शपथ घेतली.
अजित पवार यांच्या बंडामुळे राष्ट्रवादीत दोन गट पडले. त्यानंतर अनेकदा राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फोटो भाजपच्या बॅनरवर झळकल्याचं देखील पहायला मिळालं. मात्र आता शरद पवार गटाचे नेते आमदार रोहित पवार यांच्या बॅनरवर भाजप खासदार सुजय विखे यांचा फोटो लागला आहे. यावर सुजय विखे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.नेमकं काय म्हणाले सुजय विखे?
राजकारणामध्ये कटुता न ठेवता विकासासाठी एकत्र यावं लागतं असं मत खासदार सुजय विखे यांनी व्यक्त केलं. ते अहमदनगरमध्ये बोलत होते. कर्जत जामखेड मतदारसंघांमध्ये रोहित पवार यांच्या फ्लेक्सवर सुजय विखे यांचे फोटो लागले त्यावर ते बोलत होते. कुणी कुणाचा फोटो लावायचा हा त्याचा वैयक्तिक प्रश्न असतो.
कार्यकर्ते कुणाचा फोटो लावतात हे काय कुणाला विचारून लावत नाहीत. एक काळ असा होता माझे फोटो कोणी लावत नव्हतं, आज सगळेच लावतात. हा वैयक्तिक प्रश्न असतो, मात्र विकासाच राजकारण करताना एकत्र यावं लागतं तेव्हाच विकास होतो, असं विखे यांनी म्हटलं आहे.चर्चेला उधाण रोहित पवार हे शरद पवार यांच्या गटात आहेत. मात्र तरीही रोहित पवार यांच्या बॅनरवर सुजय विखे यांचा फोटो छापण्यात आल्यानं चर्चेला उधाण आलं आहे. याबाबत विखे यांनी आधीच स्पष्टीकरण दिलं आहे, कार्यकर्त्यांनी फोटो लावल्याचं त्यांनी म्हटलं आहे.