राजधानी मुंबईच्या वेशीवर असलेले पडघ्यातील बोरिवली हे गाव तसे शांत. लोकसंख्या अंदाजे चार हजार. पारंपरिक पद्धतीने शेती करून कुटुंबाचे पोट भरायचे, तसेच लहान-मोठे व्यवसाय करीत संसाराचा गाडा हाकायचा, यातच सामान्य माणूस गुंतलेला.
कोणाच्याही अध्यात व मध्यात नसलेले पडघा-बोरिवली हे गाव आता दहशतवाद्यांचा अड्डा बनू लागले आहे. पुण्यातील इसिस मॉडय़ूल कनेक्शनप्रकरणी एनआयएने (राष्ट्रीय तपास यंत्रणा) अटक केलेले सहापैकी चार दहशतवादी याच पडघा-बोरिवलीमधील असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. गुण्यागोविंदाने नांदत असलेल्या या गावात नवा सीरिया बनवण्याचा डाव दहशतवाद्यांनी आखला होता. त्यासाठी छुप्या मार्गाने तयारीही सुरू केली होती. मात्र एनआयएने दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्याने हा डाव उधळला गेला आहे.
पुण्यातील इसिस कनेक्शनचा एनआयएने पर्दाफाश केला असून आतापर्यंत सहा दहशतवाद्यांना अटक केली आहे. त्यातील जुल्फीकार बडोदावाला, शार्जिल शेख, अकिब नाचन, शामिल नाचन हे चौघे एकटय़ा बोरिवलीतील आहेत. जुल्फीकार बडोदावाला हा इसिसच्या महाराष्ट्र मॉडय़ूलचा सूत्रधार असून त्याला 3 जुलै रोजी अटक करण्यात आली, तर 5 ऑगस्ट रोजी अकिब नाचन याच्या मुसक्या आवळल्या. शामिल नाचन याला शुक्रवारी उचलले. एनआयएच्या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने आता पडघा-बोरिवलीमधील संशयास्पद व्यक्ती तसेच ठिकाणांचीही झाडाझडती सुरू केली आहे.
गेली काही वर्षे पडघा-बोरिवली हे गाव शांत होते. मात्र चार दहशतवाद्यांना पकडताच पुन्हा गाव चर्चेत आले आहे. पूर्वी सिमी या मुस्लिम दहशतवादी संघटनेसाठी स्लीपर सेल कार्यरत होते. त्यांचे पडघा-बोरिवली हे गाव प्रमुख केंद्र मानले जायचे. काही तरुण त्या कृत्यात सहभागी असल्याचे दिसून आले ते 1985 मधील ‘कनिष्क’ विमान बॉम्बस्फोटात. या कारवाईमध्ये बोरिवली गावातील जुल्फीकार मुल्ला व अकमल नाचन यांची नावे समोर आली होती, पण आजतागायत ते फरार आहेत.
– पुणे इसिस कनेक्शनप्रकरणी अटक केलेले जुल्फीकार बडोदावाला व शार्जिल शेख हे आयटीशी संबंधित असून ते एक वर्षापासून बोरिवली गावात भाडय़ाने राहत होते. अकिब नाचन याने दोघांनाही घर भाडय़ाने घेऊन दिल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे.
– विश्व हिंदू परिषदेच्या कोकण प्रांत कार्यकारिणीचे सदस्य ऍड. मनोज रायचा यांच्यावर भिवंडीमध्ये 2012 मध्ये गोळीबार झाला होता. या प्रकरणात अकिब व शामील नाचन हे दोघे आरोपी आहेत.
– बोरिवली या गावात नाचन, खोत, मुल्ला, गुजर, देवकर, पटेल, भापे, बर्डी, बलेरे व जवडे ही मुख्य कुटुंबे आहेत. एरवी शांत असलेले हे गाव दहशतवाद्यांचा अड्डा बनू लागल्याने एनआयएच्या रडारवर आले आहे.
काही वर्षांपूर्वी रेल्वेत झालेल्या बॉम्बस्फोटप्रकरणी बोरिवली गावातील साकीब नाचन याला अटक करण्यात आली होती. तो बराच काळ तुरुंगातदेखील होता. त्यामुळे गाव शांत झाले, पण अचानक त्याची जामिनावर सुटका झाली आणि ग्रामीण भागात पुन्हा एकदा दहशतवादी कृत्यांनी डोके वर काढले. त्याच्यावर 12 देशविघातक गुन्हे दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे एनआयएच्या पथकाने शुक्रवारी अटक केलेला शामिल नाचन हा साकीबचा मुलगा आहे.
सीरियाच्या भूमीत लागू होणारे सर्व शरियत कायदे आपल्याला पडघा-बोरिवली या गावातदेखील लागू करता येतील असा कट्टरपंथीयांचा विचार होता. या गावाला ‘पवित्र ठिकाण’ असे दहशतवादी संबोधतात. सीरियाप्रमाणे येथेही शुद्ध इस्लाम धर्माचा अभ्यास केला जाऊ शकतो. त्याच्या आडून दहशतवादी कृत्य करणे सोपे होईल असे वाटल्याने येथील तरुणांची माथी भडकवण्यात आली. प्रत्येकाला सीरियाला जाणे शक्य नसल्याने सीरियाप्रमाणेच पडघा-बोरिवलीसारख्या भागातदेखील दहशतवादी अड्डा बनवण्याचा डाव होता असे तपासात निष्पन्न झाले आहे.