समाजातील तीन ऋणांतून उतराई होणाऱ्या सैनिकांचा सन्मान करणारा देश सर्वार्थाने महान असतो
फलटण | जन्माला येणारी प्रत्येक व्यक्ती मातृपितृ ऋण, समाज ऋण आणि राष्ट्र ऋण अशा तीन ऋणांमध्ये जन्म घेत असते. जन्मानंतर संपूर्ण आयुष्यभर या तीन घटकांची सेवा करून आपण ऋणांतून उतराई होऊ शकतो; परंतु ही संधी सर्वांना मिळत नाही.
आपल्या मातृभूमीची सेवा करणार्या सैनिकांना ही संधी प्राप्त होते व त्यांनाच खर्या अर्थाने मोक्ष किंवा स्वर्ग प्राप्त होतो. अशा सैनिकांचा सन्मान करणारा देश सर्व अर्थाने महान होतो, असे उद्गार फलटण तालुका संघर्ष समितीचे अध्यक्ष अॅड. नरसिंह निकम यांनी व्यक्त केले.
भारतीय जनता पार्टी आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष, माजी नगरसेवक अशोकराव जाधव यांनी ‘मेरी मिट्टी मेरा देश’ या अभियानांतर्गत माजी खासदार लोकनेते हिंदूराव नाईक निंबाळकर वारकरी भवन येथे आयोजित केलेल्या माजी सैनिकांच्या सत्कार समारंभात अॅड. नरसिंह निकम बोलत होते. यावेळी फलटण नगरपालिकेचे माजी नगरसेवक महादेव उर्फ बाळासाहेब भोसले, फलटण तालुका वारकरी संघटनेचे सचिव हभप केशव महाराज जाधव, भाजपाच्या फलटण कोरेगाव मतदार संघाचे संपर्कप्रमुख सचिन कांबळे पाटील, भाजपा फलटण शहराध्यक्ष अमोल सस्ते, आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष अशोकराव जाधव, प्रा. सतीश जंगम, राजेंद्र नागटिळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी माजी सैनिक सुरेश जाधव, निवृत्ती गरड, बापू अण्णा सस्ते, प्रकाश संपतराव रणवरे, किरण नारायण फाळके, अरुण गायकवाड, रामदास सावंत, मारुतराव शिंदे, चंद्रकांत अडसूळ, अनिल निकम, तुकाराम गुलदगड या माजी सैनिकांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
संपूर्ण देशभर ९ ऑगस्ट ‘क्रांती दिन’ म्हणून साजरा केला जातो. याच दिवशी आपल्या देशाच्या सीमेवर मातृभूमीचे रक्षण करणार्या माजी सैनिकांचा सन्मान करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मेरी मिट्टी मेरा देश’ अभियान घोषित केले आहे. या अभियानांतर्गत अनेक ठिकाणी माजी सैनिकांचा सन्मान होत आहे. आज-काल देशभक्ती कुठेतरी कमी होत असल्याची खंत व्यक्त करून देशातील तरुण पिढी आणि नागरिकांमध्ये ही देशभक्ती निर्माण करणे आवश्यक असल्याचे अॅड. नरसिंह निकम यांनी सांगून देशाच्या सीमारेषेवर सैनिक संरक्षणाचे काम करीत असल्यामुळे देशवासीय आनंदात जीवन जगत आहेत. म्हणून अशा सैनिकांचे स्मरण करणे, त्यांचा सन्मान करणे हे आपले आद्य कर्तव्य असल्याचे सांगून देशाचे सैनिक होणे ही भाग्यवान गोष्ट असल्याचे अॅड. निकम यांनी सांगितले.
प्रास्ताविकात अशोकराव जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या ‘मेरी मिट्टी मेरा देश’ या अभियानांतर्गत आपण आपल्या मलठण प्रभागातील माजी सैनिकांचा सन्मान आयोजित केला असल्याचे सांगितले.
यावेळी हभप केशव महाराज जाधव, प्रा. सतीश जंगम यांनी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमास मलठण व परिसरातील नागरिक उपस्थित होते