अक्षय कुमारवर थुंकणाऱ्याला, चपलांची माळ घालणाऱ्याला 10 लाख बक्षीस देणार; UP मधून घोषणा
अक्षय कुमारच्या ‘ओएमजी-2’ चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाल्यापासून त्याला उत्तर प्रदेशमधील आग्र्यामधून विरोध केला जात आहे. आग्र्यातील ‘राष्ट्रीय हिंदू परिषद भारत’च्या कार्यकर्त्यांनी आग्रा येथील फूल सय्यद चौकामध्ये अभिनेता अक्षय कुमारच्या चित्रपटाचं पोस्टर जाळून विरोध नोंदवला.
आधी या पोस्टरला काळं फासण्यात आलं. ‘राष्ट्रीय हिंदू परिषद भारत’चे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद पाराशर यांनी एक आवाहन केलं आहे. अक्षय कुमारला चपलांची माळ घालणाऱ्या, त्याच्यावर थुंकणाऱ्याला किंवा कानाखाली मारणाऱ्याला 10 लाखांचं बक्षीस दिलं जाईल असं पराशर यांनी सांगितलं.
चित्रपटाला विरोध का?
‘ओ माय गॉड’ म्हणजेच ‘ओएमजी-2’ चित्रपटचा ट्रेलर लॉन्च झाल्यापासूनच हा चित्रपट वादात अडकला आहे. गुरुवारी म्हणजेच चित्रपट प्रदर्शित होण्याच्या एक दिवस आधी आग्रा शहरामध्ये ‘ओ माय गॉड-2’ चित्रपटाविरोधात मोठं आंदोलन झालं. पोस्टवरील अक्षय कुमारच्या चेहऱ्यावर आंदोलकांनी काळं फासलं. अक्षय कुमारच्या पुतळ्याचंही दहन आंदोलकांनी केलं. हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी ‘ओएमजी-2’ चित्रपट हिंदुच्या भावना दुखावणारा असल्याचा दावा केला आहे. हिंदू देवी देवतांचा अपमान ‘ओएमजी-2’ चित्रपटामध्ये करण्यात आल्याचं या आंदोलकांचं म्हणणं आहे. जी व्यक्ती देवांचा अपमान करत आहे त्यांना आम्ही सोडणार नाही. त्याच्याविरोधात कायदेशीर लढाई लढू आणि कठोर कारवाई करण्यास प्रशासनास भाग पाडू असंही आंदोलकांनी म्हटलं आहे.
‘ओएमजी-2’च्या ट्रेलरमध्ये भगवान शंकराची भूमिका अक्षय कुमारने साकारली आहे. या ट्रेलरमध्ये भगवान शंकराच्या अवतारामध्ये अक्षय कुमार कचोरी खाताना दिसतो, दुषित पाण्यामध्ये अंघोळ करताना दिसतो. याला शिवभक्तांनी विरोध केला आहे. अक्षय कुमारच्या फोटोंना जोडे मारत, त्याच्याविरोधात घोषणाबाजी करत त्याने साकारलेल्या या भूमिका शिवभक्तांनी विरोध केला.
शुटींग बंद पाडण्याचा इशारा
‘राष्ट्रीय हिंदू परिषद भारत’चे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद पराशर यांनी, अशा चित्रपटांना सेन्सॉर बोर्डाने परवानगी देता कामा नये असं म्हटलं आहे. यापुढे अक्षय कुमारच्या प्रत्येक चित्रपटावर आम्ही बहिष्कार टाकणार आहोत, असंही पराशर यांनी जाहीर केलं. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटगृहांमध्ये जाऊनही आम्ही आंदोलन करणार असंही त्यांनी जाहीर केलं. असे चित्रपट बनवणारे निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकारांचं शुटींग बंद पाडू असा इशाराही ‘राष्ट्रीय हिंदू परिषद भारत’ने दिला आहे.
‘ओ माय गॉड’ चित्रपटाचा पाहिला भाग 2012 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामध्ये अक्षय कुमारने भगवान श्री कृष्णाची भूमिका साकारली होती.