मुंबई : जपान सरकारच्या निमंत्रणावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे २० ऑगस्टपासून जपानला जात असून, महाराष्ट्र आणि जपान यांच्या मैत्रीसंबंधांचा नवीन अध्याय सुरू करण्याच्या दृष्टीने या दौऱ्यात प्रयत्न होणार आहे.
उद्योग, पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रातील काही प्रकल्प, सामंजस्य करार आणि सहकार्य आदी बाबींसाठी हा दौरा महत्त्वपूर्ण आहे. जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी (जायका) कडून मोठय़ा प्रमाणावर अर्थसहाय्य मिळवून विविध प्रकल्प मार्गी लावण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे.
फडणवीस यांचा हा दौरा पाच दिवसांचा असून जपान सरकारकडून राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना हे निमंत्रण देण्यात आले आहे. जपानमधील काही उद्योग महाराष्ट्रात आर्थिक गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत. त्यांच्याशी सामंजस्य करार करण्यात येणार असून राज्य सरकारकडून त्यांना जमीन, वीज, पाणी यासह काही सवलती देण्यात येतील. पायाभूत सुविधा क्षेत्रात मेट्रो, शिवडी-न्हावाशेवा पारबंदर प्रकल्प, समृद्धी महामार्ग यासह अनेक प्रकल्पांची कामे राज्यात सुरु आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात या प्रकल्पांचा खर्च वाढला असून सध्या सुरू असलेले आणि नवीन हाती घ्यावयाच्या प्रकल्पांसाठी स्वस्त दराचे आणि अधिक मुदतीचे कर्ज जायकाकडून मिळविण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे.
गेल्या तीन-चार वर्षांत जायकाकडून राज्यातील प्रकल्पांना फारसे अर्थसहाय्य मिळाले नाही. त्यासाठीच्या त्यांच्या अटी कठोर आहेत. पण आता काही प्रकल्पांचे प्रस्ताव अर्थसहाय्यासाठी सादर करण्यात येणार आहेत. शिक्षण, सामाजिक आणि आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधांची कामे मोठय़ा प्रमाणावर हाती घेण्यात येणार आहेत. त्यासाठी तांत्रिक आणि आर्थिक सहाय्याबाबत प्रस्ताव तयार करण्यात येत आहेत. फडणवीस यांच्या दौऱ्याबाबतचे तपशील निश्चित करण्याचे काम अजून सुरू आहे, असे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले.