मुंबई |आशिया कप 2023 चं काउंटडाऊन सुरु झालंय. आशिया कप स्पर्धेला 30 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत टीम इंडिया,पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, अफगाणिस्तान आणि नेपाळ असे एकूण 6 संघ सहभागी होणार आहेत.
आशिया कपचं आयोजन हे हायब्रिड पद्धतीने करण्यात आलं आहे. त्यानुसार श्रीलंका आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेत एकूण 13 सामने होणार आहेत. त्यापैकी 9 सामने हे श्रीलंकेत होणार आहेत. तर उर्वरित 4 मॅचेस या पाकिस्तानमध्ये आयोजित करण्यात आल्या आहेत.
पीसीबीने आशिया कपसाठी 17 सदस्यीय संघ 9 ऑगस्टला जाहीर केला. तर बीसीसीआय कधीही भारतीय संघाची घोषणा करु शकते. या आशिया कप स्पर्धेत टीम इंडियाच्या जर्सीत मोठा बदल दिसणार आहे. या स्पर्धेत टीम इंडियाच्या जर्सीवर पाकिस्तान अशा नावाचा उल्लेख असणार आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या चाहत्यांमध्ये संतापाचं वातावरण आहे. इंडियाच्या जर्सीवर पाकिस्तानचं नाव असण्यामागचं कारण काय, हे आपण जाणून घेऊयात.
आशिया कपचं संयुक्तिक यजमनापद हे पाकिस्तानकडे आहे. त्यामुळे या स्पर्धेतील एकूण 6 सहभागी संघाच्या जर्सीवर ‘आशिया कप 2023 पाकिस्तान’ असा उल्लेख असणार आहे. याआधी 2022 मध्ये श्रीलंकेत आशिया कप स्पर्धा खेळवण्यात आली. तेव्हा जर्सीवर श्रीलंका असं नाव प्रिंट करण्यात आली होती.