औरंगजेबाचा फोटो आणि मजकुरावरून बीडच्या केज तालुक्यात दोन गटात हाणामारी आणि दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे. आडस गावात रविवारी रात्री हा प्रकार झाला.
कोल्हापूर, अहमदनगरनंतर औरंगजेबाचे फोटो प्रकरण बीड जिल्ह्यात पोहचल्याने पोलीस प्रशासन अलर्ट झाले आहे.
बीडच्या धारूर पोलिसांनी याप्रकरणी सुमारे सोळा जणांना अटक केली असून २१ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. व्हिडिओमध्ये दोन गटाचा मोठा जमाव जमल्याचं दिसते. वाद होऊन हा जमाव समोरासमोर भिडल्याचे दिसते.
आडस गावातील अरबाज शेख नावाच्या तरुणाने औरंगजेबाच्या फोटोसह ‘किंग’ असे लिहिलं होतं. त्यानंतर त्यावर “ज्यांची बरोबरी केली जात नाही, त्यांची बदनामी केली जाते.” असा मजकूर लिहित व्हाट्सअप स्टेटस ठेवलं होतं. हे स्टेटस दुसऱ्या गटातील तरुणांनी पाहिल्यानंतर याचा जाब विचारण्यासाठी संबधीत तरुणाकडे गेले होते. त्यानंतर दोन गटात हाणामारी आणि दगडफेक झाली.
गेल्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या या घटनेने आजही (सोमवारी) आडस गावामध्ये तणावाचे वातावरण आहे. बीडच्या धारूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन सोळा आरोपींना अटक केली आहे. यातील पाच संशयीत आरोपींचा शोध सुरू आहे