अवैध गुटखा, सुगंधी तंबाखूसह पावणे तेरा लाखांचा मुद्देमाल जप्त; वडूज पोलिसांची मोठी कारवाई
वडूज तालुक्यातील विखळे मायणी रस्त्यावर एका बोलेरो गाडीतून प्रतिबंधीत असलेला गुटखा व इतर साहीत्य असा १२ लाख ७२ हजार २४० रुपयांचा मुद्देमाल वडूज पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी एकावर कारवाई करण्यात आली आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख व अपर पोलीस अधीक्षक बापूसाहेब बांगर, यांना महाराष्ट्र राज्यामध्ये बंदी असलेल्या गुटख्याची वडूज पोलीस ठाणे हद्दीत विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती. याविरूध्द कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना माण खटाव उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेडगे, वडूज पोलीस ठाण्याचे परिविक्षाधीन उपअधीक्षक अजय कोकाटे यांना दिल्या होत्या.
दि. १८ जुलै रोजी उपविभागिय पोलीस अधीकारी आश्विनी शेंडगे यांना खास बातमीदाराकडून मौजे विखळे (ता. खटाव, जि. सातारा) येथून बोलेरो पिकअप गाडी क्र.एम.एच. १३ डी.क्यु. ०५५० या वाहनातून अवैधरित्या बिगर परवाना गुटख्याची चोरटी वाहतुक होणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या अधारे पोलिसांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. उपअधीक्षक कोकाटे व कारवाई पथकाने विखळे फटा येथे सापळा रचला होता. दि. १८ जुलै रोजी कलेढोण बाजुकडुन येणाऱ्या बोलेरो पिकअपला रोखून कसून चौकशी केली असता गुटख्याची ८ पोती, पान मसाल्याची ३ पोती आढळून आली.
राज्यात गुटखा विक्रीस बंदी असताना विक्री करण्याच्या उद्देशाने गुटखा नेत असल्याचे तपासात समोर आले आहे. याप्रकरणी वडूज पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. वरिष्ठांच्या सूचनेनुसार उपविभागिय पोलीस अधीकारी अश्विनी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक अजय कोकाटे, सहाययक पोलीस निरीक्षक अमोल माने, पो. ह. माडगे, पो. ह. अमोल चव्हाण, पोलीस नाईक शिवाजी खाडे, प्रविण सानप, कॉन्स्टेबल गणेश पवार, संतोष फडतरे, कालिदास बनसोडे, दयाना मुरके, सत्यादान खाडे, सागर बदडे, शाम काळे यांनी सदरची कारवाई केली आहे.