जालना, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून दुचाकी चोरणारे ५ चोरटे जेरबंद; ११ बाईक जप्त
जाफराबाद : जालना, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून दुचाकींची चोरी करणाऱ्या टोळीचा जाफराबाद पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. दुचाकी चोरीच्या टोळीतील पाच जणांना जेरबंद केले असून, त्यांच्याकडून ११ दुचाकी, चार मोबाइल असा एकूण ८ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जाफराबाद तालुक्यातील येवता येथील दादाराव भिकाजी दाभाडे यांच्या दुचाकी चोरी प्रकरणात जाफराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान पोउपनि. प्रल्हाद मदन यांनी दत्तात्रय संजय जाधव (रा. बोरगाव फाटा, ता. जाफराबाद) याला ताब्यात घेतले होते. त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्याने दुचाकी चोरीची कबुली देत इतर सहकाऱ्यांची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी कारवाई करून जावेद हबीब मुल्तानी (रा. गोरखेडा, ता. जाफराबाद), सोमनाथ जगन्नाथ खंदाडे, वैभव ज्ञानेश्वर भोपळे, विष्णू गुलाबराव फदाट (सर्व रा. बोरगाव फदाट, ता. जाफराबाद) या चौघांनाही ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरीच्या ११ दुचाकी, चार मोबाइल असा एकूण ८ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई पोलिस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलिस अधीक्षक डॉ. राहुल खाडे, उपविभागीय पोलिस अधिकारी मुकुंद आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. प्रताप इंगळे, पोउपनि. प्रल्हाद मदन, पोना. गणेश पायघन, पोहेकॉ. प्रभाकर डोईफोडे, पोना. अनंता भुतेकर, पोहेकॉ. जायभाये, पोकाॅ. संदीप भागीले, पोकॉ. कमलाकर लक्कस, चालक अनंता डोईफोडे यांच्या पथकाने केली.
पाच गुन्ह्यांची उकल
जाफराबाद पोलिसांनी अटक केलेल्या पाच जणांकडे कसून चौकशी केली. या चौकशीदरम्यान, जाफराबाद, चिखलठाणा, अंबड, करमाड पोलिस ठाण्यात दाखल पाच गुन्ह्यांची उकल झाली आहे. इतर अनेक गुन्हे उघड होतील, अशी माहिती जाफराबाद पोलिसांनी दिली.