विरोधी पक्षनेत्याशिवाय पावसाळी अधिवेशन, काँग्रेसला ‘पंजाब’सारखी भीती?
देशभरात ‘जितेगा INDIA’ ची संकल्पना देणाऱ्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्षनेत्याची निवड करताना नाकी नऊ आले आहेत.
विधानसभेचं पावसाळी अधिवेशन गेल्या चार दिवसांपासून सुरू आहे. आज उद्या विरोधी पक्षनेता निवडला जाईल, अशी माहिती काँग्रेसच्या बड्या नेत्यांकडून दिली जात आहे. काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि सरचिटणीस के सी वेणुगोपाल यांनी विरोधी पक्षनेता निवडसाठी नावे दिली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काँग्रेस पक्षाकडून महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्षनेता पदासाठी नाना पाटोले, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण यांची नावे दिली आहे.
राहुल गांधी यांना यातल्या एका नेत्याची विरोधी पक्षनेता म्हणून निवड करायची आहे. राहुल गांधींकडून अजूनही नावाची घोषणा होत नसल्याने काँग्रेस पक्षाच्या आमदारांमध्ये नैराश्य पाहायला मिळत आहे
राहुल गांधी यांना महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्रीची निवड करायची नसून विरोधी पक्षनेत्यांची निवड करायची आहे, असे विधान भवन परिसरात आमदार खासगीत बोलत आहेत.
राहुल गांधींकडून लवकरच विरोधी पक्षनेत्याची निवड होणार असल्याची माहिती काँग्रेस नेत्यांकडून दिली जाते. राहुल गांधी यांच्या निर्णयाने पक्ष तर फुटणार नाही ना? याची काळजी सुद्धा हायकमांड कडून घेतली जात आहे. महाराष्ट्रात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मधून अजित पवार बाहेर पडून भारतीय जनता पक्ष , एकनाथ शिंदे शिवसेना सरकार मध्ये सामील झाले आहेत.
अजित पवारांसारखा निर्णय काँग्रेस मधील काही नेते घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती सुद्धा राहुल गांधींकडे आहे. महाराष्ट्रात पंजाब होण्याची भीती? राहुल गांधी यांना पंजाब सारखी भीती आहे, याची चर्चा सुद्धा काँग्रेस पक्षात सुरू आहे. पंजाब मध्ये कॅप्टन अमरिंदर सिंह यांना हटवून नवजोत सिंह सिद्धू यांना राज्याची जबाबदारी दिली होती. पंजाब मधील बदल हा राहुल गांधी यांच्या आदेशावरून झाल्याने पंजाब मधील सरकार काँग्रेसला गमवावं लागलं होतं.