यंत्रणा ‘ॲलर्ट मोड’ वर; ‘समृद्धी’सह जिल्ह्यात ट्रॅव्हल्सची तपासणी, संयुक्त मोहिमेत २६ वाहनांविरुद्ध कारवाई
बु लढाणा: समृद्धी महामार्गावर २५ प्रवाशांचे बळी घेणाऱ्या ट्रॅव्हल्सच्या अपघातानंतर संबधित यंत्रणा ‘ॲलर्ट मोड’ वर आल्या आहे. रविवारी रात्री समृद्धीसह तीन मार्गावर वाहनांची विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली.या संयुक्त कारवाईत २६ वाहनाविरुद्ध कारवाई करण्यात आली असून एक ट्रॅव्हल्स स्थानबद्ध( डिटेन) करण्यात आली.
समृद्धी महामार्गाच्या मेहकर इंटरचेंज, राज्यमार्गावरील मेहकर फाटा ( चिखली) आणि मलकापूर नजीकच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. यामध्ये प्रादेशिक परिवहन विभाग, जिल्हा वाहतूक शाखेचे आनंद महाजन, पोलीस निरीक्षक जितेंद्र आडोळे, संबंधित पोलीस ठाणे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले.
मध्यरात्रीपर्यंत चाललेल्या मोहिमेत ट्रॅव्हल्स व अन्य मिळून ८५ वाहनांची तपासणी करण्यात आली. समृद्धी इंटरचेंज येथे तपासणी करण्यात आलेल्या ३७ पैकी चार ट्रॅव्हल्स व अन्य सहा वाहनाविरुद्ध मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात आली. मेहकर फाटा येथे ३७ पैकी ६ ट्रॅव्हल्स व ४ इतर वाहनावर कारवाई करण्यात आली. राष्ट्रीय महामार्ग सहावर २१ वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये पाच ट्रॅव्हल्सवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात आली एक ट्रॅव्हल्स ‘डिटेन’ करण्यात आले आहे.