ताज्या बातम्या

स्वामी विवेकानंद माहिती


स्वामी विवेकानंद यांचे पूर्ण नाव नरेंद्र विश्वनाथ दत्त असे होते. त्यांचा जन्म १२ जानेवारी १८६३ रोजी झाला त्यांचे निधन ४ जुलै १९०२ रोजी झाले. स्वामी विवेकानंद हे मूळचे पश्चिम बंगालचे रहिवासी होते.

साहित्य, संगीत कला आणि तत्त्वज्ञान या क्षेत्रांत विशेष रस असणारे विवेकानंद हे पाश्चात्य आणि भारतीय धर्मांशी जोडले गेले होते. त्यांचा सर्व धर्मीय अभ्यास होता. सर्व धर्मांचे सार तत्व एकच आहे अशी त्यांची मान्यता होती. रामकृष्ण परमहंस यांच्या भेटीनंतर त्यांच्या जीवनाला खऱ्या अर्थाने दिशा मिळाली. गुरु रामकृष्ण परमहंस आणि हिंदू सनातन धर्मीय संदेश प्रसारित करण्यासाठी “रामकृष्ण मिशन” स्थापित करण्यात आली. रामकृष्ण मिशनतर्फे त्यांनी धर्मप्रसार केला आणि अध्यात्मिक शिकवण शेवटच्या श्वासापर्यंत देण्यात ते यशस्वी झाले.विवेकानंदांचा जन्म कोलकातामध्ये सिमलापल्ली येथे १२ जानेवारी १८६३ रोजी, सोमवारी (पौष कृष्ण सप्तमी) झाला. वडील विश्वनाथ दत्त हे कोलकाता उच्च न्यायालयात अ‍ॅटर्नी (वकील) होते. त्यांचा साहित्य, धर्म, तत्त्वज्ञान अशा विषयांशी संबंध असल्याने छोट्या नरेंद्रवर देखील तार्किक आणि धार्मिक संस्कार झाले होते. आई भुवनेश्वरी देवी यादेखील धार्मिक वृत्तीच्या होत्या.

स्वामी विवेकानंद हे संगीतात देखील विशेष रस घेत असत. त्यांनी बेनी गुप्ता आणि अहमद खान यांच्याकडून शास्त्रीय संगीताचे धडे शिकले होते. त्यामध्ये गायन आणि वादन या दोन्हींचा समावेश होता. त्याव्यतिरिक्त शारीरिक सुदृढतेकडे त्यांचे विशेष लक्ष असे. व्यायाम, लाठी चालवणे, पोहणे, कुस्ती या सर्व क्षेत्रांत ते पारंगत होते.

तर्कसंगत विचार आणि कृती यावर त्यांचा लहानपणापासून विशेष भर होता. अंधश्रध्दा, जातीव्यवस्था, धर्मांध प्रथा यांच्या विरोधात नेहमी त्यांचे प्रश्न उपस्थित असत. लहान वयातच ते लिखाण आणि वाचन शिकले होते. त्यांची वाचनाची गती खूपच अफाट होती.स्वामी विवेकानंद यांचे प्राथमिक शिक्षण ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूशनमध्ये झाले.

त्यांनी १८७९ मध्ये प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होऊन प्रेसिडेन्सी कॉलेजला प्रवेश घेतला.

त्या शिक्षणानंतर त्यांनी जनरल असेम्ब्लीज इन्स्टिट्यूशनमध्ये प्रवेश घेतला. त्यांनी तेथे तर्कशास्त्र, इतिहास, पाश्चात्त्य तत्त्वज्ञान इ. विषय हाताळले.त्यानंतर दोन वर्षांनी म्हणजे १८८१ साली फाइन आर्टची परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यांनी बी.ए. चे शिक्षण १८८४ साली पूर्ण केले.स्वामी विवेकानंद हे बुद्धिमान तर होतेच परंतु प्रत्येक गोष्ट अनुभवाच्या पातळीवर कसून बघण्याची त्यांना सवय होती. त्यांचे शिक्षण पूर्ण होताना आणि शिक्षण पूर्ण झाल्यानंतर देखील त्यांनी अनेक तत्त्वज्ञानी अभ्यासले.

यामध्ये बारूच स्पिनोझा, इमॅन्युएल कान्ट, डेव्हिड ह्यूम, गोत्तिलेब फित्शे, जॉर्ज हेगेल, आर्थर शोपेनहायर, ऑगस्ट कोम्ट, जॉन स्टुअर्ट मिल, चार्ल्स डार्विन, स्पेन्सर इ. विचारवंत आणि तत्वज्ञानी यांचा समावेश होता.

पाश्चात्य तत्त्वज्ञानी अभ्यासताना त्यांना ज्ञानाची जी भूक लागली होती ती आत्मिक होती. सर्व तत्वज्ञान फक्त बौद्धिक विश्लेषण होते. त्यानंतर त्यांनी बंगाली आणि प्राचीन संस्कृत साहित्य अभ्यासायला सुरुवात केली.

शिक्षण आणि ज्ञानाची आस पाहून त्यांना सर्वजण बुद्धिमान म्हणून ओळखत होतेच शिवाय त्यांना अफाट स्मरणशक्ती लाभलेला व्यक्ती म्हणजेच “शृतिधर” म्हणून देखील ओळखू लागले.

तार्किक आणि बौद्धिक ज्ञानाने जीवनाच्या अनुभवात काही फरक पडत नाहीये अशी मनोधारणा झाल्याने त्यांनी आत्मिक आणि अध्यात्मिक प्रवास सुरू केला तो म्हणजे गुरु रामकृष्ण परमहंस यांच्या मदतीने! स्वामी विवेकानंद यांचे तत्त्वज्ञान आणि विचार हे सर्व त्यांच्या आत्मिक अनुभवातून प्रकट झालेले आहेत.स्वामी विवेकानंद हे सर्व प्रकारच्या ज्ञानाने व्यापलेले होते. त्यांना आता आत्मिक अनुभवाची ओढ लागली होती. “देव आहे का?” या एका प्रश्नाने त्यांना एवढे ग्रसित केले होते की त्याचे उत्तर देणारा समर्पक व्यक्ती किंवा गुरु त्यांना सापडत नव्हता.

ब्रह्मा समाजाचे नेते महर्षि देवेंद्रनाथ ठाकूर यांच्या संपर्कात विवेकानंद काही काळ होते. त्यांना कदाचित उत्तर माहीत असेल म्हणून त्यांच्याकडे विवेकानंद गेले परंतु महर्षि देवेंद्रनाथ ठाकूर हे देखील विवेकानंदांना आत्मिक अनुभव प्राप्ती मिळवून देण्यात असमर्थ होते.

प्रश्नाच्या शंकेने आणि गुरूच्या शोधात असताना विवेकानंद हे एक दिवस रामकृष्ण परमहंस यांना भेटले. सर्वप्रथम विवेकानंद यांनी वाटले की आपण प्रश्न विचारू आणि परमहंस गुरु काहीतरी उत्तर देतील पण तसे झालेच नाही.

विवेकानंद म्हटले, “देव आहे का?”, रामकृष्ण उठले आणि सरळ विवेकानंद यांना म्हटले “आत्ताच जाणून घेणार का?” आणि असा साक्षात्कार दिला की विवेकानंद सफल झाल्यासारखे अनुभवू लागले.

त्यानंतर खऱ्या आत्म साक्षात्कारी प्रवासाला सुरुवात झाली. रामकृष्ण परमहंस यांनादेखील ज्ञान आणि धर्म प्रसार करण्यासाठी विवेकानंदांसारखा एक बुद्धिमान, अद्भुत आणि धाडसी व्यक्ती हवा होता, तो त्यांना मिळाला होता. इथून पुढे अध्यात्मिक साधना सुरू झाली होती. परमहंस देव यांनी स्वामी विवेकानंद यांचा शिष्य म्हणून स्वीकार केला होता.

परमहंस यांच्या अध्यात्मिक सहवासामुळे विवेकानंद उन्नत होत होते. त्यांच्यासह अन्य तरुण साधकांनी गुरु रामकृष्ण यांच्या समवेत काशीपूरच्या उद्यानात साधना केली आणि आत्मिक अनुभव प्राप्त केला.गुरु रामकृष्ण परमहंस उत्तर आयुष्यात कर्करोगाने ग्रस्त होते. अशा बिकट परिस्थितीत विवेकानंदांनी त्यांच्या कार्याचा वारसा पुढे चालू ठेवला. रामकृष्ण यांच्या महासमाधीनंतर विवेकानंदांनी रामकृष्ण मठाची स्थापना केली.

कोलकात्याजवळ वराहनगर भागात गुरुबंधू तारकनाथ यांच्या मदतीने या मठाची स्थापना सुरुवातीला एका पडक्या इमारतीत झाली. विवेकानंदांनी रामकृष्ण गुरूंनी वापरलेल्या वस्तू आणि त्यांच्या भस्म व अस्थी – कलश त्या मठात नेऊन ठेवल्या. गुरु रामकृष्ण यांचे अनुयायी व भक्‍त तेथे राहू लागले.रामकृष्ण मिशनचे कार्य आणि धर्मप्रसार हा उद्देश्य ठेवून विवेकानंद हे भारतभ्रमण करण्यासाठी बाहेर पडले. भारताची धार्मिक उदासीनता पाहून त्यांचे मन खिन्न झाले. त्यानंतर भारतीय तरुण जर अध्यात्मिक बनू शकला तर संपूर्ण परिस्थिती बदलू शकते असा त्यांना विश्वास होता.

तरुणांना मार्गदर्शन, देशसेवा, धर्म जागृती अशी अनेक कार्ये त्यांनी स्वीकारली. अत्यंत कमी वयात आत्मज्ञान झाल्याने शारीरिक साथ त्यांना मिळत नव्हती. त्यांनी त्वरित भारताबाहेर देखील जगभरात प्रवास सुरू केला. अद्वैत ब्रम्हज्ञान हेच मानवी जीवनाचे अत्युच्च शिखर आहे असा संदेश सर्वत्र पोहचवणे हे एकच उद्दिष्ट स्वामी विवेकानंद यांच्यासमोर होते.शिकागो आर्ट इन्स्टिट्यूट, शिकागो येथे ११ सप्टेंबर १८९३ रोजी सर्व धर्मीय परिषद भरली होती. त्या सभेला विवेकानंद उपस्थित होते आणि हिंदू वेदिक धर्माचे ते प्रतिनिधित्व करीत होते.

स्वामीजींनी “अमेरिकेतील माझ्या बंधू आणि भगिनींनो” अशी भाषणाची सुरुवात केली आणि सभेसाठी जमलेल्या लोकांनी जवळजवळ दोन मिनिटे टाळ्यांचा कडकडाट केला.

या परिषदेत विवेकानंदांनी सनातन वेदान्तावर व भारतीय संस्कृतीवर व्याख्यान दिले. सत्याला जाणण्याचे मार्ग आणि धर्म वेगवेगळे आहेत पण जगातील सर्व धर्मांचे सारतत्त्व एकच आहे असे त्यांनी सांगितले.

त्यानंतर काही काळ अमेरिकेतील वास्तव्यात आपल्या विचारांनी आणि व्याख्यानांनी त्यांनी अमेरिकेतील पत्रकार आणि जाणकार यांचे लक्ष वेधून घेतले. तेथील वृत्तपत्रांनी स्वामीजींच वर्णन “भारतातून आलेला एक वादळी व्यक्तिमत्त्वाचा संन्यासी”(Cyclonic Monk From India) असे केले होते.

वेदान्त आणि योग यांचा प्रसार करण्यासाठी त्यांनी अमेरिका, इंग्लंड आणि इतर युरोपीय देशांमध्येसुद्धा व्याख्याने दिली. १८९५ मध्ये अतिव्यस्ततेमुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम झाला. त्यांनी त्यानंतर योग वर्ग देण्यास सुरुवात केली. यावेळी भगिनी निवेदिता ही त्यांची शिष्य बनली.स्वामी विवेकानंद यांनी अत्यंत कमी वयात अध्यात्मिक शिखर गाठले होते. मानसिक आणि आत्मिक दिशेने जीवन गती झाल्याने शारीरिक स्वास्थ्य मात्र त्यांनी गमावले.

४ जुलै १९०२ रोजी रात्री नऊ वाजून दहा मिनिटांनी त्यांनी समाधी घेतली. ते अत्यंत अल्प म्हणजे फक्त ३९ वर्षे जगले. इतक्या कमी काळात त्यांनी अफाट धर्म कार्य केले. त्यांचे कार्य हे येणाऱ्या सर्व पिढ्या सदैव लक्षात ठेवतील. कन्याकुमारी येथे समुद्रात स्वामी विवेकानंद यांचे स्मारक उभे आहे.स्वामी विवेकानंद यांनी आपल्या धर्मकार्यात अनेक आश्रमांची स्थापना केली ज्याद्वारे त्यांना रामकृष्ण मिशनचे कार्य पूर्ण करता येईल. त्यामध्ये रामकृष्ण मठ, बेलूर मठ, सॅन फ्रान्सिस्को आणि न्यूयॉर्कमधील वेदांत सोसायटी, कॅलिफोर्निया मधील शांती आश्रम आणि भारतातील अद्वैत आश्रम यांचा समावेश होतो.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *