Pune News : पुणे हादरलं, टोळक्याकडून पोलिसांवर गोळीबार; एक पोलीस जखमी
पुणे जुलै, चंद्रकांत फुंदे : पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 9 ते 10 जणांच्या टोळक्याकडून पोलिसांवर गोळीबाराचा प्रयत्न करण्यात आला आहे. हा सर्व प्रकार कोम्बिंग ऑपरेशनदरम्यान घडला आहे.पुण्यातील वारजे माळवाडी परिसरातील ही घटना आहे. या झटापटीमध्ये एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. या प्रकारामुळे खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे. मध्यरात्री गोळीबार घटनेबाबत अधिक माहिती अशी की, मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास गुन्हे शाखेच्या युनिट 3 च्या अधिकाऱ्यांकडून कोंबिंग ऑपरेशन सुरू होतं.
पोलीस वारजे माळवाडी पोलीस स्टेशन हद्दीमधील म्हाडा वासाहतीमध्ये कोंबिंग ऑपरेशन करत होते. याचदरम्यान पोलिसांना रोझरी स्कूलच्या जवळ आठ ते दहा व्यक्त संशयास्पद हालचाली करताना दिसून आले. या व्यक्तींना ताब्यात घेण्यासाठी पोलीस त्यांच्या दिशेनं जात असताना एका संशयित आरोपीनं पोलिसांवर बंदूक रोखली. आरोपींनी पोलिसांच्या दिशेनं फायर करण्याचा प्रयत्न केला.
याचदरम्यान त्यातील एका आरोपीने धारदार शस्त्र पोलिसांच्या दिशेनं मारून फेकल्यानं या घटनेत एक पोलीस अधिकारी जखमी झाला आहे. अंधाराचा फायदा घेऊन आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र यातील पाच आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे. इतर आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींकडून एक गावठी कट्टा त्यामध्ये जिवंत चार राऊंड, दोन लोखंडी कोयते, कटावणी, स्क्रू ड्रायव्हर, हातोडा असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. हे सर्व आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्यांच्याविरोधात विविध गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिसांनीही आरोपीच्या दिशेनं फायरिंग केली.