वेळेत निकालासाठी कुलगुरूंचा नवा प्रस्ताव! प्राध्यापकांना घरी बसून तपासता येणार पेपर; इंटरनेट डेटा पॅक मिळणार
सोलापूर : परीक्षेनंतर निकाल वेळेत जाहीर होऊन विद्यार्थ्यांना नोकरी व पुढील शिक्षणाचा मार्ग मोकळा व्हावा म्हणून आता पेपर तपासणाऱ्या प्राध्यापकांना डेटा पॅक देण्याचा प्रस्ताव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने तयार केला आहे.
जेणेकरून ते स्वत:च्या संगणक किंवा लॅपटॉपवर घरी बसून पेपर तपासू शकतात.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची सत्र परीक्षा १९ जूनपासून सुरु झाली. त्यातील पहिल्या पेपरचा निकाल (बीएस्सी) आता जाहीर झाला आहे. आता बीएस्सी बायो टेक्नॉलॉजीचाही निकाल अंतिम टप्प्यात आला आहे. प्राध्यापकांना आता ठरावीक केंद्रावर न येता ते कोठेही बसून पेपर तपासणीची सोय उपलब्ध करून दिल्याने निकाल अवघ्या १०-१२ दिवसात जाहीर होत असल्याचे प्रभारी कुलगुरू डॉ. रजनीश कामत यांनी सांगितले. मागील अनुभव लक्षात घेऊन कुलगुरूंनी स्कॅनरची संख्या दुप्पट केली आणि तेथील कर्मचाऱ्यांची ड्यूटी दोन शिफ्टमध्ये केली आहे. पेपर तपासणाऱ्या प्राध्यापकांचे पॅनल देखील नवीन तयार करून त्याची संपूर्ण जबाबदारी त्या त्या महाविद्यालयांवर सोपविल्याने आता निकालास विलंब होणार नाही, असा विश्वास कुलगुरू डॉ. कामत यांनी व्यक्त केला आहे.
लवकरच नवीन पद्धतीनुसार कामकाज
विद्यापीठाने विद्यार्थ्यांचा निकाल वेळेत जाहीर व्हावा म्हणून ऑनस्क्रिन मूल्यमापन पद्धती सुरु केली आहे. पेपर तपासणीची संपूर्ण जबाबदारी संबंधित महाविद्यालयांवर सोपविली आहे. आता प्राध्यापकांना कोठेही पेपर तपासता यावेत म्हणून डेटा पॅक देण्याचा प्रस्ताव आहे. जेणेकरून पेपर तपासणी ते घरी बसून किंवा महाविद्यालयात देखील करू शकतात.
– डॉ. रजनीश कामत, प्रभारी कुलगुरू, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ
सिंहगड कॉलेजमध्ये उत्तरपत्रिका स्कॅनिंग
विद्यापीठाने घेतलेल्या परीक्षेतील उत्तरपत्रिका एकत्रितपणे स्कॅन करण्यासाठी सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात केंद्र तयार करण्यात आले आहे. त्याठिकाणी २४ स्कॅनर असून दररोज झालेले पेपर त्याठिकाणी स्कॅन केले जातात. त्या उत्तरपत्रिका संबंधित विषयांच्या प्राध्यापकांना जातात. लॉगिन आयटी व पासवर्ड टाकल्यानंतर त्यांना उत्तरपत्रिका तपासता येणार आहेत.
‘लॉ’चे पेपर दुसरीकडे तपासले जाणार?
जिल्ह्यातील ‘लॉ’चे पेपर दरवर्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या माध्यमातून तपासले जातात. पण, अनेकदा पेपर तपासणीस विलंब होतो किंवा निकालात त्रुटी राहतात, अशा तक्रारी असतात. या पार्श्वभूमीवर आता आगामी काळात ‘लॉ’चे पेपर पुणे किंवा कोल्हापूर विद्यापीठाकडून तपासून घेतले जातील, अशी माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली.