अहमदनगर : माजी मुख्यमंत्री (कै.) वसंतराव नाईक जयंतीनिमित्त 1 जुलै रोजी कृषिदिन साजरा करण्यासाठी पंचायत समितीला जास्तीत जास्त 10 हजार, तर जिल्हा परिषदेला 20 हजार रुपये खर्च करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.
त्यामुळे पंचायत समिती, जिल्हा परिषद मुख्यालयी शेतकर्यांसाठी चहापाणी, छोटेसे प्रदर्शन आदी कार्यक्रम होणार आहेत. कै. नाईक मुख्यमंत्री असताना त्यांनी कृषी क्षेत्रात भरीव कामगिरी केली.
त्यामुळे त्यांची जयंती कृषिदिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय राज्य शासनाने 21 जून 1989 रोजी घेतला. कृषिदिन दर वर्षी साजरा करण्यास कायमस्वरूपी शासनमान्यता देण्याचा निर्णयदेखील नुकताच घेतला. कृषी दिनानिमित्त प्रत्येक पंचायत समितीसाठी 10 हजार रुपये, तर जिल्हा परिषदेला प्रत्येकी 20 हजार रुपये खर्च करण्यास शासनाने मान्यता दिली. त्यासाठी 16 जून रोजी अध्यादेश जारी केला आहे. राज्यभरात यासाठी 42 लाख 30 हजार रुपये खर्च येणार आहे. यामध्ये जिल्ह्यातील 1 लाख 60 हजार रुपयांचा समावेश आहे.
कृषिदिन साजरा करण्यासाठी राज्याचे कृषी आयुक्त संबंधितांना सूचना करणार आहेत. त्यांनी दिलेल्या मार्गदर्शन सूचनातील बाबीवरच खर्च करावा लागणार आहे. शेतकर्यांना चित्रफिती दाखविणे, चहापाणी, जिल्हा परिषद स्तरावर छोटेसे प्रदर्शन तसेच मंडप, हारतुरे व छायाचित्र यावर खर्च होणार आहे. यासाठीचा खर्च मात्र, जिल्हा परिषद सेस फंडातील उपलब्ध अनुदानातून करण्याचे निर्देश दिले आहेत.
कृषी अधिकारी, विद्यापीठाचे शास्त्रज्ञ बांधावर
खरीप पेरणी कालावधीत आता कृषी विभागाचे क्षेत्रीय कर्मचारी, अधिकारी तसेच विद्यापीठाचे शास्त्रज्ञ व विस्तार यंत्रणा शेतकर्यांच्या बांधावर जाऊन शेतकर्यांना मार्गदर्शन करणार आहेत. यासाठी कृषी विद्यापीठ आणि कृषी विभागाची यंत्रणा यांनी याबाबत कृती आराखडा तयार करुन त्यांची अंमलबजावणी करावी असे निर्देश शासनाने दिले आहेत.