विठुरायाच्या पूजेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अन् विखे पाटलांची रंगली फुगडी
पंढरपूर येथे आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी (ता. २९) पहाटे सपत्नीक पूजा केली. यावर्षी त्यांच्यासोबत अहमदनगर जिल्ह्यातील भाऊसाहेब काळे व त्यांच्या पत्नी मंगल काळे या दाम्पत्याला महापूजा करण्याचा मान मिळाला.महापुजेसाठ एकनाथ शिंदे यांच्यासह सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आरोग्य मंत्री तानाजी सावंत होते. पूजा पार पडल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांना वारकऱ्यांनी फुगडी खेळण्याचा आग्रह धरला. त्यासाठी राधाकृष्ण विखे पाटील पुढे आले. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदेही पुढे आले. त्यांनी विखे पाटलांना नमस्कार केला. त्यानंतर शिंदे आणि विखे पाटलांनी फुगडीचा फेर धरला. यानंतर राधाकृष्ण विखे आणि तानाजी सावंत यांनीही फुगडी खेळण्याचा आनंद लुटला.
यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी विठ्ठलाला ‘बळीराजाला चांगले दिवस येऊ दे, चांगला पाऊस होऊ दे,’ असे साकडे घातले. ते म्हणाले, “यंदा मला सलग दुसऱ्या वर्षी विठ्ठलाच्या महापूजेचा मान मिळाला. गतवर्षी सरकार स्थापन करून मी विठ्ठलाच्या महापूजेला आलो होतो. विठ्ठलाच्या कृपेने राज्यात सर्वकाही सुरुळीत सुरू असून, सरकार लवकरच आपले एक वर्ष पूर्ण करणार आहेत.”
दरम्यान, यावर्षी राज्य सरकारने वारकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते विठ्ठल -रुक्मिणीची महापूजा सुरू असतानाही भाविकांना विठुरायाचे मुखदर्शन घेण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली. यामुळे विठ्ठलाचे महापूजेनंतरचे तेजस्वी रुप हजारो वारकऱ्यांना पाहता आले. यामुळे वारकऱ्यांना चार तास ताटकळण्याची वेळ आली नाही. या निर्णयाचे वारकऱ्यांनी स्वागत केले आहे. आषाढी एकादशीनिमित्त आज प्रथम विठ्ठलाच्या मूर्तीला चंदनाचा लेप लावून अभिषेक करण्यात आला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विठ्ठलाची सपत्नीक महापूजा केली. विठ्ठलाची महापूजेनंतर शिंदे व काळे दाम्पत्यासह रुक्मिणी मातेच्या दर्शनाला गेले. त्या ठिकाणी त्यांनी रुक्मिणी मातेला दुग्धाभिषेक करून त्यांचीही पूजा केली.