मणिपूरमध्ये राहुल गांधींचा ताफा अडवला, हिंसा पीडितांना भेटण्यापासून रोखलं
काँग्रेस नेते राहुल गांधी हिंसाचार उफाळलेल्या मणिपूरच्या दौऱ्यावर पोहोचले आहेत. राहुल गांधी दोन दिवस मणिपूरमध्ये असणार आहेत. मणिपूरमध्ये पोहोचल्यानंतर राहुल गांधी विमानतळावरुन थेट हिंसाचार पीडितांना भेटण्यासाठी गेले होते.
पण पोलिसांनी रस्त्यातच त्यांचा ताफा अडवला आहे. पोलिसांनी परिसर हिंसाचारामुळे धगधगता असल्याचं कारण दिलं आहे. राहुल गांधी यांचा ताफा बिष्णूपूर जिल्ह्यात रोखण्यात आला आहे. राहुल गांधी इंफाळपासून फक्त 20 किमी पुढे जाऊ शकले आहेत.
राहुल गांधी आजपासून दोन दिवसांच्या मणिपूर दौऱ्यावर आहेत. गुरुवारी सकाळी दिल्लीहून विमानाने ते मणिपूरसाठी रवाना झाले. राहुल गांधी 29 आणि 30 जून असे दोन दिवस मणिपूरमध्ये असणार आहेत. यावेळी ते मदत शिबिरांचा दौरा करणार असून, पीडितांशी चर्चा करत त्यांची स्थिती जाणून घेणार आहेत. याशिवाय राहुल गांधी राजधानी इंफाळ आणि चुराचांदपूर येथील सिव्हिल सोसायटीच्या प्रतिनिधींशी चर्चा करणार आहेत. राहुल गांधी दुपारी तुइबोंगच्या ग्रीनवूड अकॅडमी आणि चुराचांदपूर येथील सरकारी कॉलेजमध्ये जाणार आहेत. यानंतर ते कोन्जेंगबामधील सार्वजनिक हॉल आणि मोइरांग कॉलेजात जाणार आहेत.