ताज्या बातम्यामहत्वाचेमुंबई

४० हजार कोटी गुंतवणुकीच्या प्रकल्पांना मान्यता; १ लाख २० हजार रोजगार निर्मिती


मुंबई : राज्यात सुमारे ४० हजार कोटी रुपये गुंतवणुकीच्या नऊ विशाल प्रकल्पांना उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बुधवारी झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यामुळे राज्यात सुमारे १ लाख २० हजार रोजगार निर्मिती होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत उपस्थित होते.

पुणे, छत्रपती संभाजीनगर येथे गोगोरो इंडिया प्रा. लि. कंपनीमार्फत इलेक्ट्रिक व्हेईकल व बॅटरी निर्मिती तसेच स्वॅपिंग स्टेशन इन्फ्रास्ट्रक्चरची उभारणी करण्यात येणार आहे. हा देशातील पहिला प्रकल्प ठरणार असून त्यास अतिविशाल प्रकल्प म्हणून मान्यता देण्यात आली.गोगोरो कंपनी संपूर्ण राज्यात आगामी काळात सुमारे १२ हजार बॅटरी स्वॅपिंग स्टेशन्स स्थापन करणार आहे. त्यामुळे राज्यात इलेक्ट्रिक व्हेईकल पायाभूत सुविधा आणि ईव्हीच्या वापराला चालना मिळणार आहे. छत्रपती संभाजीनगर येथे विद्युत वाहन (इलेक्ट्रिक व्हेईकल्स) व बॅटरीची निर्मिती करणाऱ्या इथर एनर्जी कंपनीद्वारे ८६५ कोटी गुंतवणुकीच्या विशाल प्रकल्पास मान्यता देण्यात आली आहे. तसेच पुणे येथे देशातील पहिल्या ई-बस निर्मितीच्या ७७६ कोटी गुंतवणुकीच्या पिनॅकल मोबिलिटी सोल्युशन्स प्रा. लि. या घटकाच्या विशाल प्रकल्पास मान्यता देण्यात आली. पुणे येथे पिनॅकल मोबिलिटी सोल्युशन्स कंपनीकडून हायड्रोजन इंधन-सेल वाहन निर्मिती सुविधा उभारण्यात येणार आहे.

रायगड येथे परफॉर्मन्स केमिसर्व कंपनीच्या २७०० कोटी गुंतवणूच्या प्रकल्पास, २०३३ कोटी गुंतवणुकीच्या स्मार्टकेम टेक्नॉलॉजीज कंपनीचा प्रकल्प रायगड येथे, जनरल पॉलिफिल्मस कंपनीचा ५०० कोटी गुंतवणुकीचा प्रकल्प नंदूरबार येथे, विप्रो परी रोबोटिक्स कंपनीचा ५४४ कोटी गुंतवणुकीचा प्रकल्प सातारा येथे तर ११० कोटी गुंतवणुकीचा गणराज इस्पात कंपनीचा प्रकल्प अहमदनगर येथे सुरू करण्यास मान्यता देण्यात आली. तसेच जेम्स अँड ज्वेलरी आर्ट प्रमोशन कॉन्सिलद्वारे नवी मुंबई येथील महापे येथे स्थापित होणाऱ्या इंडिया जेम्स अँड ज्वेलरी पार्क प्रकल्पाला अतिविशाल प्रकल्प म्हणून दर्जा देण्यात आला.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *