कोर्टयार्ड मॅरिएटमधील कामगारांना 12 हजार 900 रुपयांची वेतनवाढ, भारतीय कामगार सेनेचा ऐतिहासिक करार
भारतीय कामगार सेनेच्या प्रयत्नामुळे अंधेरीच्या हॉटेल कोर्टयार्ड बाय मॅरिएटमधील कामगारांना 12,900 रुपयांची वेतनवाढ मिळाली आहे. हा करार भारतीय कामगार सेना व हॉटेल व्यवस्थापन यांच्यादरम्यान चार वर्षांच्या कालावधीसाठी केला आहे.
या करारामुळे कर्मचाऱयांमध्ये आनंदाचे वातावरण असून त्यांनी भारतीय कामगार सेनेचे आभार मानले आहेत.
हॉटेल कोर्टयार्ड बाय मॅरिएट या हॉटेलमध्ये भारतीय कामगार सेना गेली कित्येक वर्षे मान्यताप्राप्त युनियन असून सध्याचा वेतनवाढीचा चौथा करार आहे. या कराराद्वारे वरील रकमेच्या 30 टक्के रक्कम पहिल्या वर्षाकरिता, 25 टक्के रक्कम दुसऱया वर्षाकरिता, 22.5 टक्के रक्कम तिसऱया वर्षाकरीता आणि 22.5 टक्के रक्कम चौथ्या वर्षाकरिता अशी विभागून देण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त बोनस रकमेत मेडिक्लेम पॉलिसीच्या रकमेत वाढ करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे सध्या अस्तित्वात असलेल्या सुविधा कामगारांना यापुढेदेखील मिळणार आहेत.
सदर करारावर भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते-खासदार अरविंद सावंत, कार्याध्यक्ष अजित साळवी, संयुक्त सरचिटणीस दिलीप जाधव यांनी तसेच हॉटेल व्यवस्थापनाच्या वतीने जनरल मॅनेजर व्हिक्टर चॅन, एचआर डायरेक्टर अर्चना सावंत, एचआर मॅनेजर पंकज मांजरेकर, फायनान्स डायरेक्टर अजय वोरा, फायनान्स मॅनेजर इंद्रकुमार, युनिट कमिटीतर्फे अध्यक्ष रुपेश कदम, चिटणीस प्रमोद निंबरे, खजिनदार राकेश गुजर, कमिटी सदस्य प्रभू बासुतकर, योगेश चव्हाण, रायन शेख, जयेश बागवे यांनी स्वाक्षऱया केल्या.