पुणे पोलिसांची अंमली पदार्थ विरोधी मोहीम, जनजागृतीपर दिंडी, चर्चासत्र, पथनाट्य आणि रॅली
जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्ताने (दि.26) पुणे पोलिसांकडून शहर परिसरात अमली पदार्थाच्या दुष्परिणामाबाबत जनजागृतीपर दिंडी, शाळा, महाविद्यालयात चर्चासत्र आणि रॅली तसेच गर्दीच्या ठिकाणी पथनाट्य असे विविध उपक्रम राबवून जनजागृती करण्यात येणार आहे.
यंदा प्रथमच उद्यापासून पुढील दोन महिने हा उपक्रम सुरू राहणार आहे. प्रत्येक पोलीस ठाणे स्तरावर हा उपक्रम घेण्याबाबत सूचना करण्यात आल्या असून जनजागृतीसाठी पोस्टर देखील बनविण्याचे सांगण्यात आले आहे.
जगभरात 26 जून हा जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. हा दिवस अंमली पदार्थांचे सेवन एखाद्याच्या शारीरिक आणि मानसिक आयोग्यावर कसे दुष्परिणाम करते, यामुळे एखाद्या व्यक्तीचे संपूर्ण आयुष्य कसे बिघडू शकते याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो. या दिवशी जगभरात शाळा, महाविद्यालये, कामाची ठिकाणे आणि सार्वजनिक ठिकाणी या विषयावर जागरुकता निर्माण करण्यासाठी तसेच ड्रग्ज आणि त्याच्या दुष्परिणामविषयी माहिती देणारे कार्यक्रम आयोजित केले जातात. नशेमध्ये अडकलेल्या लोकांचं जीवन वाचवणे, जागरूकता करणे हा या दिवसाचा मूळ उद्देश आहे. मात्र, हा दिवस केवळ एकच दिवस साजरा न करता लोकांमध्ये जनजागृती आणि त्याच्या व्यापक परिणामासाठी पुणे पोलिसांकडून सुमारे दोन महिने हा उपक्रम सुरू ठेवण्यात येणार आहे. यासाठी मागील काही दिवसांपासून पुणे पोलीस दलाकडून तयारी सुरू आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार, गुन्हे शाखेचे अप्पर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, सुनील थोपटे यांच्या पथकाकडून यासाठीची तयारी करण्यात आली आहे. सोमवारी (दि.26) जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्ताने पोलीस आयुक्तालयातून जनजागृती दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. शाळा, महाविद्यालयातील सुमारे 400 विद्यार्थी यावेळी उपस्थित राहणार आहे. शहरातील काही भागात ही दिंडी निघणार आहे. यानंतर पुढील दोन महिन्याच्या काळात प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी रॅली, हद्दीतील शाळा, महाविद्यालयात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, चर्चासत्र घेतले जाणार आहेत. याबाबत प्रत्येक पोलीस ठाण्यांना सूचना देण्यात आल्या आहे. अंमली पदार्थ विरोधी जनजागृतीसाठी पुणे पोलिसांनी व्यापक मोहीम हाती घेतली आहे.
जनजागृतीसाठी कुठले उपक्रम?
– शाळा, महाविद्यालय, आयटी कंपनीत जनजागृती
– प्रमुख, गर्दीच्या चौकात पथनाट्य
– सार्वजनिक ठिकाणी जनजागृतीपर पोस्टर
– ठिकठिकाणी दुचाकी रॅलीचे आयोजन
– झोपडपट्ट्या परिसरात जनजागृतीवर भर
अंमली पदार्थाचे सेवन आरोग्याला हानिकारक असून याबाबत व्यापक जनजागृतीसाठी दोन महिने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून कारवाई केली जाते. मात्र, केवळ कारवाईच नाही तर जनजागृतीवर या मोहिमेत भर दिला आहे. आयटी कंपनी, शाळा, महाविद्यालय भागात विविध उपक्रम राबविले जातील. याला चांगला प्रतिसाद मिळाल्यास मोहिमेचा कालावधी आणखी वाढविला जाईल.
– रितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर.