ताज्या बातम्यामहत्वाचेमहाराष्ट्रमुंबई

छाप्यांनी काटा काढायचा डाव! मुंबईत एकाच वेळी 15 ठिकाणी छापे, शिवसेना ‘लक्ष्य’


केंद्र आणि राज्य सरकारकडून राजकीय विरोधकांविरुद्ध तपास यंत्रणांचा खुलेआम गैरवापर होत आहे. अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) आडून सुडाचे राजकारण सुरू आहे.

मुंबईत आज सांताक्रुझ, मालाड, परळ, वरळी, वांद्रे येथील 15 ठिकाणांवर ईडीने छापे मारले. त्यात प्रामुख्याने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला लक्ष्य बनवले गेले. कथित कोविड घोटाळय़ाप्रकरणी शिवसेना सचिवांच्या ठिकाणांवर ईडीने धाडी घातल्या. महानगरपालिकेचे तत्कालीन अधिकारी तसेच लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेसच्या अधिकाऱयांचीही झाडाझडती ईडीने घेतली. ईडीच्या या कारवायांबद्दल प्रचंड संताप व्यक्त होत असून कमळाबाईच्या पदराआड लपलेल्यांना अभय का, असा सवाल केला जात आहे.

कोरोना काळात लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस कंपनीकडून गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. कोविड सेंटरला वैद्यकीय साहित्य पुरवण्याचे काम या कंपनीला देण्यात आले होते. त्याप्रकरणी ईडीने या कंपनीचे भागीदार सुजीत पाटकर यांच्या घरावर तसेच कार्यालयांवर छापे मारले. सांताक्रुझ पूर्व वाकोला येथील सुमित आर्टिस्टा बिल्डिंगच्या सी विंगमध्ये सुजीत पाटकर यांचे घर आहे. सकाळी आठ वाजता पाटकर यांच्या घरी धडकलेले ईडीचे अधिकारी सुमारे तीन तासांनंतर पावणेअकरा वाजता तेथून निघून गेले. एकाच वेळी एकूण पंधरा ठिकाणी ईडीची कारवाई आज सुरू होती.

शिवसेना सचिव सूरज चव्हाण यांच्या चेंबूर येथील निवासस्थानावर आज ईडीने छापा मारला. चेंबूरच्या के. के. ग्रॅण्ड या इमारतीच्या अकराव्या मजल्यावर सूरज चव्हाण राहतात. ईडीचे पाच अधिकारी सकाळी सवाआठच्या सुमारास तिथे पोहोचले आणि त्यांनी चव्हाण यांची चौकशी केली. कथित कोविड पंत्राट घोटाळय़ाप्रकरणी ही चौकशी असल्याचे सांगण्यात आले.

सूरज चव्हाण यांच्या पाठोपाठ ईडीच्या अधिकाऱयांनी त्याचप्रमाणे ईडीच्या पथकाने सनदी अधिकारी व महापालिकेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त संजीव जैस्वाल यांच्या घरावरही छापा मारला. वांद्रे पूर्व येथील रुस्तमजी ओरियाना टॉवरमध्ये चौथ्या मजल्यावर जैस्वाल राहतात. त्यांच्या घराची ईडीच्या अधिकाऱयांनी झडती घेतली. त्यावेळी जैस्वाल हे घरी नव्हते.

शिंदे गटात गेलेल्यांची चौकशी का होत नाही? ठाणे-पुणे-नागपुरातही कारवाई करा
ईडीकडून केवळ शिवसैनिकांवर कारवाई केली जात असून, कोविड काळात आमच्याबरोबर होते आणि नंतर शिंदे गटात गेले त्यांची चौकशी का होत नाही, असा सवाल विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला. ही कारवाई केवळ पक्षपातीपणे केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. मुंबईपाठोपाठ ठाणे, पुणे, नागपूरसह सर्व ठिकाणी कारवाई आणि चौकशी झाली पाहिजे, असे दानवे म्हणाले. कोविड काळात ठाण्यात खरेदी केलेले साहित्य आजही तसेच पडून आहे. त्यात किती गैरव्यवहार झाला याचीदेखील चौकशी होणे गरजेजे आहे.

लेना ना देना, फिर भी…
शिवसैनिकांवर होत असलेली ईडीची कारवाई ही केवळ राजकीय दबावापोटी आहे. लेना ना देना फिर भी शिवसेना. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महानगरपालिकेतील रस्ते घोटाळा व अन्य घोटाळय़ांचा जाब विचारण्यासाठी येत्या 1 जुलै रोजी महापालिकेवर विराट मोर्चा काढण्याची घोषणा मंगळवारी केली आणि दुसऱयाच दिवशी आज शिवसेना सचिव सूरज चव्हाण यांच्या घरावर ईडीने छापा मारला. हा योगायोग नसून राजकीय सुडातून केलेली ही कारवाई आहे, अशी चर्चा शिवसैनिकांबरोबरच सामान्य मुंबईकरांमध्ये सुरू आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेतील नगरसेवकांवर दबाव आणण्याचाही हा मिंधे आणि भाजपचा डाव असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

…तेवढा शिवसैनिक पेटून उठेल
सूरज चव्हाण यांच्या घरावर ईडीने छापा मारल्याचे समजताच शेकडो शिवसैनिक चव्हाण यांच्या राहत्या इमारतीखाली जमा झाले आणि त्यांनी मिंधे सरकार तसेच भाजपविरोधात जोरदार घोषणा दिल्या. दबाव टाकून जिंकू असे भाजप आणि मिंधे सरकारला वाटतेय, पण ते कधीच साध्य होणार नाही. जेवढा दबाव टाकाल तेवढा शिवसैनिक पेटून उठेल, अशी संतप्त प्रतिक्रिया शिवसैनिकांनी दिली.

हा योग आहे की हे भोग आहेत!
जागतिक योगदिनी महाराष्ट्रात विविध तऱहा पाहायला मिळाल्या. यात सत्ताधाऱयांच्या कसरती प्रेक्षणीय होत्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईतील कार्यक्रमात सहभागी झाले. या दोघांनी केलेली योगासने पाहिल्यास हा योग आहे की जबरदस्तीचा भोग आहे, असाच प्रश्न नेटकऱयांना पडला. शिंदे-फडणवीसांच्या अजब योगासनांचा व्हिडीओ व्हायरल झाला असून त्याची खिल्ली उडवण्यात आली.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *