शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा 57 वा वर्धापन दिन सोहळा अफाट उत्साहात आणि दिमाखात उद्या, सोमवारी किंग्ज सर्कल येथील षण्मुखानंद सभागृहात होत असून या सोहळ्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत आणि ओजस्वी विचारांतून 19 जून 1966 रोजी स्थापन झालेला शिवसेना पक्ष 57 वर्षांचा झाला आहे. या 57 वर्षांत अनेक वादळे आली तरी ती परतवून लावत शिवसेनेची घोडदौड सुरूच आहे. मराठी माणसांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि हिंदुत्वाचा आवाज बुलंद करण्यासाठी अंगार बनून लढणाऱया शिवसेनेचा 57वा वर्धापन दिन उद्या असून या सोहळ्याची उत्कंठा तमाम शिवसैनिकांना आहे.
वर्धापन दिन सोहळ्याच्या प्रवेशिका मुंबईतील विभागप्रमुखांमार्फत वितरित करण्यात येणार असून ‘प्रथम येणाऱयास प्रथम प्राधान्य’ या तत्वावर आसन व्यवस्था असणार आहे, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे. या सोहळ्यात ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा मनोरंजनात्मक कार्यक्रम ठेवण्यात आला आहे.
वर्धापन दिन सोहळ्याला शिवसेनेचे लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित राहणार असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे प्रमुख मार्गदर्शन असणार आहे. या सोहळ्यात उद्धव ठाकरे शिवसैनिकांना नेमका कोणता संदेश व विचार देतात आणि भाजप तसेच मिंध्यांचा कसा समाचार घेतात, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.