ठाणे जिल्ह्यात लुटमारीचे २१ गुन्हे करणारा इराणी चोरटा शहाड मधून अटक
डोंबिवली- ठाणे जिल्ह्याच्या विविध भागात घरफोड्या, लुटमार करणाऱ्या एका सराईत चोरट्याला मानपाडा पोलिसांनी कल्याण जवळील शहाड येथून गुरुवारी अटक केली. २४ वर्षाच्या या चोरट्यावर विविध पोलीस ठाण्यात एकूण २१ गुन्हे दाखल आहेत.
तो आंबिवलीतील इराणी वस्तीत राहतो.मुस्तफा उर्फ मुस्सु जाफर सय्यद इराणी असे अटक आरोपीचे नाव आहे. मुस्तफावर सोनसाखळी चोरी, मंगळसूत्र चोरी, मोबाईल चोरी, घरफोड्या, वाहन चोरी असे गुन्हे दाखल आहेत. त्याच्याकडून पोलिसांनी आठ दुचाकी, सोन्याचा ऐवज, मोबाईल फोन जप्त केले आहेत. पोलीस त्याच्या साथीदारांचा शोध घेत आहेत. विविध पोलीस ठाणी त्याच्या मागावर होती.
डोंबिवली परिसरातील सोनसाखळी, मंगळसूत्र चोरीच्या घटना वाढल्याने साहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे यांनी विशेष पथकांच्या साहाय्याने चोरट्यांना पकडण्याच्या सूचना केल्या आहेत. मानपाडा पोलिसांनी पोलीस निरीक्षक सुरेश मदने, साहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील तारमळे, अविनाश वनवे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथके तयार केली होती.
सीसीटीव्ही चित्रणाच्या साहाय्याने चोरट्यांचा शोध घेत असताना शहाड परिसरात एक सोनसाखळी चोर येणार आहे, अशी माहिती मानपाडा पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी शहाड परिसरात सापळा लावून मुस्तफाला अटक केली. त्याने कळवा, मानपाडा, शिवाजीनगर, मध्यवर्ति पोलीस ठाणे उल्हासनगर, कोळसेवाडी, नारपोली अशा अनेक पोलीस ठाणे हद्दीत चोरी, लुटमारीचे प्रकार केले आहेत. त्याच्यावर एकूण २१ गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी १३ गुन्हयांची उकल झाली आहे, अशी माहिती साहाय्यक पोलीस आयुक्त कुराडे यांनी दिली.त्याच्याकडून दुचाकी वाहनांसह एकूण सव्वा चार लाखाचे सामान जप्त करण्यात आले आहे. त्याच्या साथीदाराच्या मागावर पोलीस आहेत.