मंचर : आंबेगाव तालुक्यातील शेतकरी नागरिक बिबट्याच्या वाढत्या संख्येने भयभीत झाले असतानाच शनिवारी रात्री मंचर शहरालगत असलेल्या जुन्या चांडोली रस्त्यावर बिबट नर- मादी फिरत असल्याचे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे.
त्यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनखात्याने तात्काळ पिंजरा बसवून या नरमादीला जेरबंद करावे अशी मागणी राहुल थोरात यांनी केली आहे.
आंबेगाव तालुक्यात मागील आठ ते दहा वर्षांपासून मंचरपासून पूर्व भागात सर्वच गावांमध्ये बिबट्याची दहशत वाढली आहे. शेतकऱ्यांना रात्रीचे शेतीला पाणी देण्यास मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. काल पहाटे १ वाजून ३८ मिनिटांनी मंचर शहरानजीक असलेल्या थोरात मळ्यात, जुना चांडोली रस्त्यावर धनश्री थोरात व राहुल थोरात व माजी सैनिक रवींद्र थोरात यांना रात्री कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणावर भुंकण्याचा आवाज येऊ लागल्याने ते बाहेर येऊन पाहिल्यावर त्यांना दोन बिबटे घराभोवती फिरत असल्याचे निदर्शनास आले. या बिबट्यांचे फिरणे सीसीटीव्हीत कैद झाले आहे.
या परिसरात बिबट्यांचा वावर वाढल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. तर याच परिसरात जुना चांडोली रस्त्यावर नोव्हेंबर २०२२ मध्ये बिबट्याने महिलेवर हल्ला केल्याची घटना घडली होती. त्यानंतर या ठिकाणी पिंजरा लावण्यात आला होता. १८ नोव्हेंबर व एक डिसेंबर २०२२ यादरम्यान एकूण दोन बिबटे या परिसरातून जेरबंद करण्यात आले होते. बिबट्या जेरबंद झाल्यानंतर येथील स्थानिक नागरिक, शेतकरी यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला होता. मात्र पुन्हा या परिसरात बिबटे मुक्तपणे संचार करत असल्याचे दिसल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने तात्काळ या ठिकाणी पिंजरे लावून बिबटे जेरबंद करावे अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.