कराची : पाकिस्तानची आर्थिक स्थिती अत्यंत वाईट झाली आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी पंतप्रधान शहबाज शरीफ प्रचंड प्रयत्न करत आहेत.
मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश येताना दिसत नाहीये. या आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी सरकारने ऊर्जा बचत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी मार्केट, मॉल आणि लग्नाचे हॉल बंद करण्याचा निर्णय पाकिस्तानच्या सरकारने घेतला आहे. पाकिस्तानच्या ऊर्जा संरक्षण योजनेच्या अंतर्गत ही पावलं उचलण्यात आली आहेत. यापूर्वी युरोपातही वीज बचत करण्यासाठी असे निर्णय घेतले होते. पण तिथली कारणं वेगळी होती. रशिया आणि युक्रेनच्या युद्धामुळे रशियाने या देशांमध्ये गॅसचा पूरवठा बंद केला होता.
पाकिस्तानच्या कॅबिनेटची मंगळवारी बैठक पार पडली. त्यात ऊर्जा बचत करण्याचा आणि आयात करण्यात येणाऱ्या तेलावरील निर्भरता कमी करण्यासाठी राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. पाकिस्तानातील बाजार आणि मॉल आता रात्री साडे आठलाच बंद केले जाणार आहेत. तसेच लग्नाचे हॉलही रात्री 10 वाजता बंद होतील. त्यामुळे 60 अब्ज रुपयांची बचत होणार असल्याचं पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी सांगितलं.
पंख्यांचे उत्पादन बंद
देशात विजेचं संकट निर्माण होऊ नये म्हणून 1 फेब्रुवारीपासून हिटिंग बल्बच्या निर्मिती बंद केली जाणार आहे. तसेच वीज खेचणाऱ्या पंख्यांचे उत्पादनही जुलैपासून बंद करण्यात येणार आहे. या उपाययोजनांमुळे 22 अब्ज डॉलरची बचत होणार आहे.
तसेच सरकार एक वर्षाच्या आत गीजरचा वापरही अनिवार्यही करणार आहे. त्यात गॅसचा वापर करून 92 अब्ज रुपयांची बचत केली जाणार आहे. स्ट्रीट लाईटलाही पर्याय दिला जाणार असून त्यातून चार अब्ज रुपयांची बचत होणार आहे, अशी माहिती संरक्षण मंत्र्याने दिली.
‘वर्क फ्रॉम होम’ लागू
देशातील सर्व सरकारी आणि खासगी कार्यालयात ऊर्जेची बचत केली जाणार आहे. तसेच वर्क फ्रॉम होम करण्यास मंजूरी दिली जाणार आहे. येत्या 10 दिवसात त्याबाबतचं धोरण ठरवलं जाणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.
कॅबिनेट उघड्यावर
आज कॅबिनेटची बैठक झाली. या बैठकीत विजेचा वापर करण्यात आलाच नाही. देशासमोर उदाहरण घालून देण्यासाठी ही बैठक बाहेर उघड्यावर ठेवली होती, अशी माहितीही त्यांनी दिली.
सरकारी विभागांची 30% वीज वाचवणार
सरकारी विभागांकडून होत असलेला विजेचा वापर कमी केला जाणार आहे. 30 टक्के वीज वाचवली जाणार आहे. तशी योजनाच तयार केली आहे. त्यातून 62 अब्जाची बचत होणार आहे. तसेच इंधनाची आयात कमी करण्यासाठी 2023च्या अखेरीपर्यंत इलेक्ट्रिक मोटारसायकल लॉन्च केली जाईल. ऊर्जा बचतीच्या योजना तात्काळ लागू केल्या जात आहेत. त्यावर कॅबिनेटचं लक्ष असणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.
आर्थिक संकट वाढलं
पाकिस्तान सध्या आर्थिक संकटातून जात आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या चारमाहीत (जुलै ते ऑक्टोबर) मुद्रास्फीती 21-23 टक्क्याच्या दरम्यान राहणार आहे. देशाची महसूली तूट 115 टक्क्यांवर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशाची आर्थिक परिस्थिती आणखीनच डबघाईला येण्याची शक्यता आहे.