धक्कादायक प्रकार निवडणुकीत सून विजयी सासऱ्याची पपईची बाग उध्वस्त
ग्रामपंचायतीचे निकाल नुकतेच समोर आले आहे. या निकालानंतर अनेक ठिकाणी छोटे-मोठ वाद तर काही ठिकाणी दगडफेक करण्यात आल्याच्या घटना देखील समोर आल्या आहेत.
दरम्यान औरंगाबादमध्ये विरोधात निकाल आल्याने अज्ञात व्यक्तींनी निवडून आलेल्या महिलेच्या सासऱ्याची पपईची बाग उध्वस्त केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ज्यात अंदाजे साडेतीनशे पपईचे झाड एका रात्रीतून कापण्यात आले आहेत. याप्रकरणी दौलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत करोडी परिसरातील रामभाऊ धोंडिबा दवंडे यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांची करोडी शिवारातील गट क्रमांक 85 मध्ये 7 एकर शेतजमीन आहे. यातील एका एकर जमिनीमध्ये दवंडे यांनी आठ महिन्यांपूर्वी जवळजवळ 700 झाडांची पपईची बाग लावली होती. तर काबाडकष्ट करून त्यांनी पपईच्या झाडांची देखभाल केली. यामुळे या झाडांना मोठ्या प्रमाणात पपय्या लागल्या होत्या. मात्र अज्ञाताने रात्रीच्या सुमारास परिपक्व झालेली जवळजवळ साडेतीनशे पपईची झाडे तोडून टाकली. गुरुवारी सकाळी रामभाऊ शेतात गेल्यावर हा सर्व प्रकार उघडकीस आला. यात रामभाऊ दवंडे यांचे जवळपास दोन ते तीन लाखांचे नुकसान झाले. तर त्यांच्या तक्रारीवरून दौलताबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सून निवडून आल्याने झाडं तोडली…
रामभाऊ धोंडिबा दवंडे यांनी केलेल्या आरोपानुसार, करोडी ग्रामपंचायतीच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत त्यांची सून सोनाली दवंडे या वॉर्ड क्रमांक 1 मधून निवडणुकीत उतरल्या होत्या. या निवडणुकीत त्यांचा विजय झाला आहे. तर निकालानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांच्या शेतातील पपईची बाग तोडून त्यांचे मोठे आर्थिक नुकसान करण्यात आले आहे. त्यामुळे आपली सून निवडून आल्यानेच अज्ञात व्यक्तीने बदल्याच्या भावनेने आपल्या शेतातील पपईची बाग कापून फेकली असल्याचा आरोप दवंडे यांनी केला आहे. त्यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनंतर झाडे तोडणाऱ्या व्यक्तीचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे.
मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान…
शेती उत्पन्नावर अवलंबून असलेल्या रामभाऊ दवंडे यांनी काबाडकष्ट करून पपईच्या झाडांची देखभाल केली. झाडांना मोठ्या प्रमाणात पपय्या लागल्याने त्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. आधीच अतिवृष्टीमुळे इतर पिके वाया गेली असतांना, पपईतून तरी दोन पैसे मिळतील अशी अपेक्षा त्यांना होती. मात्र एका रात्रीतून त्यांच्या अपेक्षेवर पाणी फेरले गेल्याने दवंडे यांना मोठा धक्का बसला आहे. यात त्यांचे दोन ते तीन लाखांचे नुकसान झाले