मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर राज्याचे रोहयो मंत्री संदिपान भुमरे यांच्या मावस भावाचा अपघातात मृत्यू
मुंबई पुणे एक्स्प्रेसवर शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांचा अपघातात मृत्यू झाल्यामुळे अवघ्या महाराष्ट्र हळहळला होता.
आज पुन्हा एकदा मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर राज्याचे रोहयो मंत्री संदिपान भुमरे यांच्या मावस भावाचा अपघातात मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रोहयो मंत्री संदीपान भूमरेंच्या मावस भावाचा अपघातात मृत्यू झाला. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर हा अपघात झाला.
अंबादास हरिश्चंद्र नरवणे असं त्यांचं नाव होतं. ते पाचोड चे रहिवाशी आहेत. नरवणे हे इनोव्हा गाडीतून मुंबईवरून पुण्याच्या दिशेने येत होते.
पहाटे कामशेतजवळ त्यांची इनोव्हा गाडी टेम्पोला पाठीमागून धडकली, नंतर इनोव्हा कारही मधल्या डिव्हाईडरवर आदळली.
त्याचवेळी मागून आलेली चारचाकी आणि ट्रकने एकामागोमाग धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, यात इनोव्हाचा चुराडा झाला. यात नरवणे यांचा मृत्यू झाला. नरवणे यांच्यासोबत त्यांचे मित्र आणि चालक गाडीत होते.
हे दोघे जखमी झाले. जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेने पैठण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.