परराष्ट्र मंत्री एस जयशंकर (External Affairs Minister S Jaishankar) सध्या न्यूयॉर्क (Newyork) दौऱ्यावर आहेत.
त्यांनी संयुक्त राष्ट्र महासभेला (UN General Assembly) संबोधित करण्यापूर्वी शनिवारी न्यूयॉर्कमध्ये एका कार्यक्रमाला संबोधित केले. यावेळी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले की, स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतर भारत जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला आहे. अठराव्या शतकात भारताचा जगातील एकूण अर्थव्यवस्थेतील वाटा एक चतुर्थांश होता. परंतु विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत गुलामगिरीमुळे परिस्थिती बिघडली आणि भारत हा गरीब देशांपैकी एक बनला. पण स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षी भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून जगासमोर अभिमानाने उभा आहे. एवढेच नाही तर भारत आणखी वेगाने वाटचाल करत आहे.
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर ‘भारत@75: इंडिया-यूएन पार्टनरशिप इन एक्शन’ (India@75: India-UN Partnership in Action) या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी न्यूयॉर्कमध्ये पोहोचले होते. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात भारताच्या अर्थव्यवस्थेसह इतर अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. परराष्ट्र मंत्री म्हणाले की, अलीकडच्या काळात भारताने डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे अन्न सुरक्षा प्रणाली यशस्वीरित्या अपग्रेड केली आहे. याद्वारे सामान्य जनतेपर्यंत अन्नधान्य पोहोचलं आहे.
‘2047 पर्यंत भारताला विकसित देश बनण्याचे ध्येय’
एस जयशंकर यांनी आपल्या भाषणात म्हटलं की, भारतात डिजिटल तंत्रज्ञानाचा चांगल्या प्रकारे वापर करत आहे. याचा जनतेला फायदा झाला आहे. भारतात डिजिटल तंत्रज्ञानाच्या मदतीने 80 कोटी लोकांना अन्न सुरक्षेअंतर्गत रेशन देण्यात आलं आहे. भारताने 2047 पर्यंत विकसित देश बनण्याचे लक्ष्य ठेवलं आहे. देशातील दुर्गम गावं आणि शहरं डिजिटल करणे हे आमचे लक्ष्य आहे, ज्यावर आम्ही वेगाने काम करत आहोत, असंही परराष्ट्र मंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
आपल्या भाषणात एस जयशंकर यांनी भारत आणि संयुक्त राष्ट्रांसोबतच्या संबंधाबद्दल सांगितलं की, पृथ्वीची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आम्ही संयुक्त राष्ट्रांसोबतचे संबंध अधिक मजबूत करण्यासाठी वचनबद्ध आहोत. भारताचा संयुक्त राष्ट्रांच्या तत्त्वांवर आणि सनदेवर पूर्ण विश्वास आहे.